उल्हासनगर । उल्हासनगरात ‘एमएमआरडीए’च्या वतीने ७ रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. या कामांबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांनी ‘एमएमआरडीए’ अभियंत्यांची आढावा बैठक घेऊन या रस्त्यांचे कामे तातडीनेने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत. उल्हासनगरात या ७ रस्त्यांच्या आणि ड्रेनेजच्या खोदकामामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यांची कामे जलदगतीने सुरू करण्याबाबत दोन्हीही संस्थांनी समन्वय साधून काम पूर्ण करण्याबाबत आयुक्त आव्हाळे यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या. त्यात उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प मागे कैलास कॉलनी, कॅम्प पाच मधील न्यू इंग्लिश हायस्कूल ते लालचक्की, पेट्रोलपंप आणि हिल लाईन पोलीस ठाणेपर्यंत, कॅम्प नंबर एक येथील ए ब्लॉक ते साईबाबा मंदिर, डॉल्फिन क्लब आणि सेंच्युरी ग्राउंड, कॅम्प नंबर चारमधील सोनार चौक ते कोयांडे चौक, कॅम्प नंबर तीन येथील हिराघाट मंदिर ते डर्बी हॉटेल, कॅम्प नंबर तीन येथील शामा प्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन मार्ग येथे सिमेंट काँक्रिट आणि कॅम्प नंबर चारमधील वॉक्को कंपाऊंड ते विनस चौक-वी. टी. सी. ग्राउंड या सर्व सिमेंट काँक्रिट रस्ते तातडीने तयार करण्यात यावेत. तसेच एमएमआरडीए अधिकार्यांनी मनपाच्या संबंधित अधिकर्यांशी समन्वय साधून या कामांच्या प्रगती संदर्भात व्हॉट्सअॅपवर दररोज माहिती देण्यात यावी, अशी सूचना आयुक्तांनी एमएमआरडीए अधिकार्यांना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, ‘एमएमआरडीए’चे कार्यकारी अभियंता अमोल जाधव, शहर अभियंता तरुण सेवकानी, कार्यकारी अभियंता, परमेश्वर बुडगे, कार्यकारी अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, एमएमआरडीएच्या सातही रस्त्यांचे संबंधित ठेकेदार आणि सल्लागार आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.