उल्हासनगर । उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात चार कोटी ९० लाखांची कर वसुली करण्यात आली असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजय साबळे यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता धारकांना करात सूट मिळावी म्हणून अभय योजना लागू केली आहे. अभय योजनेच्या पहिल्याच दिवशी रुपये २, ६९, ९४, ६४२ तर दुसर्या दिवशी रुपये २०१३४४८ इतकी वसुली झाली आहे. या अभय योजनेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेच्या माध्यमातून २०० कोटीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू अनेक भागातील मालमत्ता धारकांना अभय योजनेबद्दल कोणतीच माहिती नसल्याने कर वसुलीवर याचा दुषपरिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या अभय योजनेच्या अनुषंगाने मालमत्ता कर भरणा वाढीसाठी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनखाली सोमवारी उल्हासनगर महापालिका मुख्यालया मध्ये सर्व कर निरीक्षक आणि वसुली लिपिक यांची बैठक आयोजित करुन त्यांना मालमत्ता कर वसुली बाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला उपायुक्त विशाखा मोटघरे, सहायक आयुक्त (कर ) अजय साबळे, कर निर्धारक व संकलक निलम कदम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत जवळपास ७४ लाख ३४ लाख इतकी करवसुली झाली असून आर्थिक बजेटमध्ये १५०कोटी अपेक्षित होते. नवीन बजेट येईपर्यंत मालमत्ता कर वसुली ८५ कोटींपर्यंत जेमतेम पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.