उल्हासनगर । उल्हासनगर पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे उल्हासनगरच्या विविध भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा नसल्याने श्रीराम नगरातील संतप्त नागरिकांनी बुधवारी पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पाणी प्रश्नावर पालिकेला जाब विचारण्यासाठी श्रीरामनगर परिसरातील महिलांनी बुधवारी थेट नेताजी चौक येथील पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. आंदोलनानंतर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र तरी देखील कमी प्रेशरने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती.
सोमवारी सायंकाळी अंबरनाथ पालेगाव येथील मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कॅम्प नंबर चार आणि पाचमधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. प्रशासनाकडून या बाबत कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू झाली. मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी देखील पाणी न आल्याने महिलांनी आणि नागरिकांनी थेट आंदोलनाचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी श्रीरामनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने गोळा होऊन पाणीपुरवठा कार्यालय गाठले. आम्हाला चार दिवसांपासून पाणी नाही, लहान मुले, वयोवृद्ध त्रस्त आहेत, पाणी पुरवठा कधी करणार? असा जाब संबंधित अधिकार्यांना विचारला. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही, असे ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले.
यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अश्विन राठोड यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी तातडीने चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी दूर करत अखेर श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तरी देखील पाण्याचा दाब कमी असल्याने बर्याच भागात पाणी आले नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेक महिन्यांपासून येथील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. लहान मुले, वृद्धांना याचा त्रास होत आहे. पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला जातो, हा महापालिकेचा ढिसाळपणा आहे. म्हणूनच आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुढील आठ दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर आम्ही महिला महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया रहिवासी भाविका म्हात्रे यांनी दिली.