मुंबई – शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यावर धक्के बसत आहेत. कोकणातून मोठ्या प्रमाणात पक्षाला गळती लागली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव, माजी आमदार वैभव नाईक या नेत्यांबद्दलही उलटसुलट बातम्या येत आहेत. मुंबईतील पदाधिकारीही मातोश्रीसमोर नतमस्तक होऊन पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. या सगळ्या परिस्थितीत ठाकरे गटाला मुंबई महापालिकेला सामोरे जाण्याचे आव्हान आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतरही ही पहिली मुंबई महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
पक्षातील गळती थांबवण्यासाठीच्या उपाय योजना करण्यास ठाकरे गटाकडून सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाची नुकतीच बैठक झाली, त्यात दर मंगळवारी पक्षाची आढावा बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी कुर्ला आणि कलिना येथील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एप्रिल-मे मध्ये मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली.
आता एकदाच धक्का देऊ…
कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक सहाच्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी, उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांसोबत संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, रोज बातम्या येत आहेत, उद्धव ठाकरेंना धक्का! उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता मी धक्का पुरुष झालो आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले. कोण किती धक्के देतं ते बघूया, यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का देऊ, त्यावेळी असा देऊ की हे पुन्हा दिसता कामा नये, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
विधानसभेतील चूक पुन्हा होऊ देऊ नका – उद्धव ठाकरे
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी शाखेनुसार दिलेली कामे करावी. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता, जी चूक तेव्हा झाली ती आता होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा
मुंबई महापालिकेसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक यासह विविध महानगर पालिकांच्या निवडणुका मागील तीन ते पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात रखडलेला आहे. यावर अंतिम सुनावणी याच महिन्यात होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, भाजप यासह इतरही पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची भाजपनेही तयारी केली आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Manikrao Kokate : राहुल गांधींचे सदस्यत्व दुसऱ्याच दिवशी रद्द; माणिकराव कोकाटेंबद्दल महायुती सरकार काय करणार