Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईUddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंविरोधातील अविश्वास प्रस्तावावर उद्धव ठाकरे म्हणाले, खरं तर उशीरच झाला

Uddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंविरोधातील अविश्वास प्रस्तावावर उद्धव ठाकरे म्हणाले, खरं तर उशीरच झाला

Subscribe

मुंबई : विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी खर तर आमच्याकडूनच उशीर झाला. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊन त्यांचे आतापर्यंत निलंबन होयला हवे होते.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबद्दल केलेल्या विधानावर त्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी भूमिकादेखील त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच, ‘सुरतेला पळून जाणाऱ्या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यावरील चित्रपट दाखवा,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टोला लगावला. (Uddhav Thackeray reaction on Neelam Gorhe no confidence motion)

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : रामदास कदमांना अंगावर घेणारा नेता ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अविश्वास प्रस्ताव आणल्यावरती या अधिवेशनात आम्हाला चर्चा अपेक्षित आहे. कोणीही नियम आणि कायदेभंग केला असेल तरीही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हा अविश्वास ठराव ज्या कारणांसाठी आणला गेला, ती कारणे लवकरच तुमच्या सर्वांसमोर येतील. पण, पक्षांतर हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणून याआधीच हा ठराव आम्ही आणला पाहिजे होता.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच ते आमदार अबू आझमी यांच्या विधानावर म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांविषयी अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. आमचीदेखील हीच मागणी असणार आहे. त्यामुळे निलंबन किती मिनिटांसाठी, तासांसाठी केले आहे याची कल्पना नाही. पण पुन्हा असे कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये. त्यामुळे सरकारने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांचे निलंबन कायमचे करायला हवे.” असे ठामपणे सांगितले आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. यावर पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या निर्णयचा विरोध करत टीका केली. याबद्दल इंडि आघाडीतीलच घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, “अखिलेश यादव यांना काय आक्षेप घ्यायचा आहे तो घेऊ द्या. संपूर्ण महाराष्ट्राने अबू आझमी यांचा विरोध केला आहे. जर त्यांना असे वाटत असेल तर अखिलेश यादव यांनी त्यांच्याकडून त्यांना तिकीट देऊन निवडून आणावे,” असे म्हणत त्यांनी अखिलेश यादव यांना टोला लगावला आहे. त्यामुळे आता इंडि आघाडीमध्ये याचे काय पडसाद पडतात? याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.