मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (9 मार्च) ईशान्य मुंबईत निर्धार शिबीर घेतले. यावेळी त्यांनी भाजपवर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी वादग्रस्त विधान केले. “घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे,” असे विधान केले होते. त्यांनंतर राज्यात अनेकांनी यावर टीका केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केली. “परवा जे अनाजीपंत जोशी, घाटकोपरमध्ये बडबडून गेले. म्हणाले घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. तुमच्या बापाने आम्हाला मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून बलिदान करून मिळवली आहे,” असे म्हणत त्यांनी संघावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray Shivsena UBT criticized RSS Bhaiyyaji Joshi statement about marathi langauge)
हेही वाचा : Uddhav Thackeray : भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी हेच फेक नरेटिव्ह, उद्धव ठाकरे कडाडले
“ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात. संघवाले हे गच्चीत काठ्या घेऊन बसतात, त्या काठ्या कपडे वाळत घालायला ठिक आहे. जसा यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काही संबंध नाही.” असे म्हणत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, “आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोअर आहे. तेच कुंभमेळ्यात गेले नाहीत तर आम्ही कसे जाणार?” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘एकनाथ शिंदेंची कामे अडवायला मी काही उद्धव ठाकरे नाही,’ असे विधान केले होते. यावरून उद्धव ठाकरे मुंबईतील सभेत म्हणाले की, “कामाला स्थगिती द्यायला काय उद्धव ठाकरे आहे का? असं विचारणारे फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत. आपल्या राज्याचे नुकसान होऊन त्यांच्या मालकाच्या मित्राचे खिसे भरणारे हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत.” असे म्हणत प्रत्युत्तर दिले. तसेच, ते पुढे म्हणाले की, “आम्हीही जय श्री रामाच्या घोषणा देत आहोत. रामावर यांचा काय अधिकार? आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही जय श्रीराम म्हणणारच, पण भाजपवाल्यांना जय शिवाजी, जय भवानी म्हणायला लावणार. तुम्ही आता दैवतावरून भांडणे लावत आहात का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.