मुंबई – गर्व से कहो हम हिंदू है, त्यासोबतच अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना झाली आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यकर्मात ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्या कुंभस्नानावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर दोन गुजराती म्हणून टीका केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी केला.
कितीही डुबकी मारा…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळ्यातील गंगास्नानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि त्यांचे पाप धुतले जाणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि आणि त्यांच्या इतर सहयोगी संघटनांकडून जय श्रीरामचा आग्रह केला जातो, यावरुनही ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, आपण एकमेकांना नमस्कार करताना रामराम म्हणायचो. त्याचे श्रीराम कधीपासून झाले आणि आपण म्हणायला लागलो, याचाही विचार करण्याची गरज आहे.
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र गीत शमिमा अख्तर या तरुणीने म्हटले होते, याचा उल्लेख करुन उद्धव ठाकरे म्हणाले, हे गीत तिने ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्यांसमोर म्हटले. त्यावेळी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असा टोला उद्धव ठाकरेंनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
मुंबई आंदण मिळाली नाही, रक्त सांडून मिलवली
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई ही आंदण मिळालेली नाही. ही मुंबई रक्त सांडून, बलिदान देऊन मिळवलेली आहे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही, त्यांच्या हाती देश गेला आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी ज्यांचा संबंध नाही, त्यांच्या हातात राज्य आहे, हे आपले दुर्दैव आहे.
उद्धव ठाकरेंचा महायुतीवर गंभीर आरोप
शाहीर अमर शेख यांच्या ओळींचा हवाला देत उद्धव ठाकरे म्हणाले, अमर शेख यांनी दिल्ली गाजवली. दो कवडीके मोल मराठी बिकने को तय्यार नही, अशा त्यांच्या गाण्यातील ओळी होत्या. ते आपले मराठी सत्व कुठे गेले, आज सर्व विकाऊ झाले आहेत. आता या सरकारने इतिहास दालन रद्द करुन लाडक्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा घाट घातला आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला.
परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी
मायमराठी मरते इथे, परकीचे पद चेपू नका
भाषा मरते देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे
गुलामी भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शीरे कापू नका
या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची आठवण करुन देत उद्धव ठाकरे म्हणाले, आता दिल्लीत पाय चेपणारे आहेत. त्यांची तिथे काहीच टाप नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास उशिर झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात किती टाळाटाळ केली. निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंची शिवाजी महारांजाना उद्देशून कविता; कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?