वसई : सध्याचे दुचाकी चालक रस्ता मोकळा दिसला नाही की आपल्या दुचाकीला इतक्या वेगाने पळवतात की, त्यांची स्पर्धा ही वाऱ्याशीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. पण यामुळे अनेकदा भीषण दुर्घटना घडतात आणि चालकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच काहीसा प्रकार वसई पूर्वेतील मधुबन परिसरात घडला आहे. दोन भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. 22 फेब्रुवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात ज्या तिघांचा मृत्यू झाला आहे, ते नेमके कोण? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, या अपघाताची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांकडून हळबळ व्यक्त करण्यात आली आहे. (Vasai Accident Three killed in collision between two bikes in Madhuban area)
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्व येथील मधुबन परिसरात रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असतो. ज्यामुळे अनेक दुचाकी चालक भरधाव वेगाने दुचाकी चालवतात. अशातच शनिवारी रात्री हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी भरधाव वेगात आले असता, त्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली. ज्यामध्ये दोन्ही दुचाकीवरील तिघांता जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनाकरिता जवळील रुग्णालयात पाठवले. मृतांची ओळख पटली नसल्याने ते काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा… Maharashtra Weather : महाराष्ट्र तापला, मुंबईत तापमानाचा पारा 37 अंशापार
मधुबन परिसरातील हा रस्ता मोकळा असल्याने आणि मुळात निमुळता असल्याने अनेकदा या ठिकाणी चालकांना वाहन चालविण्याचा अंदाज राहात नाही. त्याचमुळे शनिवारी रात्री दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या आहेत. या रस्त्यावर हल्ली अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारे अपघात हे या परिसरातील मुख्य समस्या आहे. ज्यामुळे या मार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. या दुर्घटनेनंतर आता नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.