विरार : बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अशामध्ये विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत घेतात. नुकतेच बोर्डाची बारावीची परीक्षा पार पडली. एकीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची चिंता असताना दुसरीकडे त्यांचे टेन्शन वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये एका शिक्षिकेच्या घरी बारावीच्या काही उत्तरपत्रिका जळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (virar news answersheets of 12th exams burned in teacher home)
विरारमध्ये एक शिक्षिका बारावीच्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक आग लागली आणि या आगीमध्ये या सर्व उत्तरपत्रिका जळल्या. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. वसई विरारमधील व्हिडीओ असून शिक्षिकेच्या निष्काळजीपणाविरोधात विध्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड येथील आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. या शिक्षिकेने 12 वी वाणिज्य शाखेचे पेपर पुनर्तपासणीसाठी घरी आणले होते. यावेळी काही कारणस्तव त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. पण त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असताना अचानक शॉर्टसर्किट झाले आणि घरामध्ये आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासह बारावीचे पेपरही जळाले. उत्कर्ष शाळेतील हे पेपर असून एकूण 175 उत्तर पत्रिका जळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या शिक्षिकेवर काय कारवाई होणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, या 175 विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय ? असादेखील सवाल आता पालकांनी उपस्थित केला आहे.
नांदेडमधील त्या घटनेने संताप
काही दिवसांपूर्वी बारावीचे पेपर चालत्या बसमध्ये तपासणाऱ्या शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडीओ हा नांदेडमधील असल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये एक शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होता. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासात होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक विद्यार्थी पालक संघटनांनी अशा घटना वेळीच थांबल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल, अशी चिंता व्यक्त केली होती.