मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हे यांचे कान टोचले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागतात, असे खळबळजनक विधान त्यांनी केले. यानंतर ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी नीलम गोऱ्हेंवर सडकून टीका केली. महायुतीतील प्रमुख घटकपक्ष भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोऱ्हेंचे कान टोचले. साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी गोऱ्हेंच्या वक्तव्यापासून स्वतःला वेगळे करुन घेतले.
वयाच्या सत्तरीत असलेल्या नीलम गोऱ्हे या संविधानीक पदावर आहेत. विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेच्या त्या उपसभापती आहेत. चार टर्म विधानपरिषदेच्या आमदार आहेत. अशा पदावरील व्यक्तीकडून करण्यात आलेल्या वक्तव्याने साहित्यिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
नीलम गोऱ्हेंचा प्रवास
नीलम गोऱ्हे या हडाच्या शिवसैनिक नाहीत. शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी तीन राजकीय पक्ष बदलले. एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर फार उशिरा त्यांनीही पारडे बदलले आणि शिवसेना शिंदे गट हा त्यांचा चौथा राजकीय पक्ष आहे.
नीलम गोऱ्हे यांचा व्यवसायाने डॉक्टर. त्यांनी बीएएमएस केलेले आहे. युक्रांद चळवळीतून त्या सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या. दलित, शोषित, मजूर आणि स्त्री मुक्तीच्या आंदोलापासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. यानंतर त्या प्रकाश आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये (भारिप) आल्या. साधारण 1982-83चा तो काळ होता. प्रकाश आंबेडकर यांचीही महाराष्ट्राच्या राजकारणातील ती सुरुवात होती. भारिपच्या तिकीटावर नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकही लढवली. मात्र संसदीय यश त्यांना मिळू शकले नाही. त्यानंतर काही काळ त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्येही (आरपीआय-ए) घालवला. भारिप आणि रिपाई या दोन्ही पक्षांचा बेस दलित राजकारण राहिला. एका जातीच्या पक्षात निवडून येऊ शकत नाही, याचे आकलन कदाचित नीलम गोऱ्हे यांना झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेही नीलम गोऱ्हे फार रमल्या नाही.
युक्रांद, भारिप, रिपाई, काँग्रेस असा प्रवास झाल्यानंतर 1998 मध्ये नीलम गोऱ्हे यांनी 360 च्या कोनात विचारधारा बदलली आणि 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांच्यावर पुण्याची जबाबदारी देण्यात आली.
शिवसेनेकडून चार वेळा विधानपरिषदेवर वर्णी
नीलम गोऱ्हे यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली ती बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने शिवसेनेतून. शिवसेनेत अवघे चार वर्षे काम केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आमदारकीची संधी दिली. बाळासाहेब ठाकरे हयात असताना दोन वेळा त्या विधानपरिषदेवर आमदार झाल्या आणि शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दोन वेळा त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली.
2002 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले (पहिली टर्म)
2008: महाराष्ट्र विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले (दुसरा टर्म)
2014: महाराष्ट्र विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले (तिसरे टर्म)
2020: महाराष्ट्र विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले (चौथी टर्म)
नीलम गोऱ्हेंची शिवसेनेतील 20 वर्षे
शिवसनेकडून चार वेळा विधानपरिषदेवर निवड झालेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेती कारकिर्दीवर पुस्तक लिहिले. ‘शिवसेनेतील माझी २० वर्षे’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
याशिवाय ‘उरल्या कहाण्या’, ‘समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने’ ( नोव्हेंबर 2020) ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या जीवनावर आधारीत ‘अपराजिता’ हे अंजली कुलकर्णी लिखित पुस्तक देखील आहे.