मुंबई – महिलांना मातृशक्ती म्हटले जाते. ही मातृशक्ती एखाद्याला जीवदान देण्यातही आघाडीवर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पुरुषांपेक्षा तब्बल तीन पटींनी अघिक महिलांनी अवयवदान केले आहे. त्यातही राज्याची राजधानी मुंबईतील महिला सर्वात पुढे आहेत. अवयवदानात मुंबईतील महिलांचा पहिला क्रमाकं आहे.
नेहमीच म्हटले जाते की, महिला या सर्वच क्षेत्रात आता आघाडीवर आहेत. अवयवदानातही आता महिलांनी आघाडी घेतली आहे. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अवयवदान हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. राज्यात अवयवदानात आतापर्यंत पुरुषांची आघाडी होती. मात्र मागील काही वर्षामध्ये अवयवदानात महिलांनी आघाडी घेतली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीत मागील तीन वर्षांमध्ये मुंबईतील 1,073 महिलांनी किडनी दान केली आहे. राज्यात अवयवदानात मुंबईतील महिला पुढे आहेत. तर ब्रेनडेड अवयवदानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील 715 महिलांनी किडनी तर 215 महिलांनी यकृतदान केले आहे.
आई, बहीण, पत्नी सर्वच भूमिकेतील महिला पुढे
कुटुंबातील व्यक्तीला अवयवदान करुन त्यांना जीवदान देणाऱ्यांमध्ये महिला सर्वात पुढे आहेत. आई, मुलगी, पत्नी, बहीण, सासू अशा विविध भूमिकेतील महिला या आपल्या आप्तजनांना अवयवदान करताना दिसत आहेत. अवयवदान नियमानुसार जिवंत असताना फक्त किडनी आणि यकृतदान केले जाऊ शकते. मातृशक्ती ही कुटुंबातील सदस्यांना नवे जीवन देण्यासाठी या दोन्ही अवयवांचे दान करण्यात मागेपुढे पाहात नसल्याचे समोर आले आहे.
स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायजेशनने दिलेल्या माहितीनुसार, 2020 ते 2024 या चार वर्षांमध्ये 4321 किडनी आणि यकृतांचे दान करण्यात आले. यापैकी तब्बल 3171 महिलांनी किडनी आणि यकृतदान केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी अवयवदान केले आहे.