रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची व्यवस्था करावी – चंद्रकांत पाटील

करोना व्हायरसमुळे हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी कामगारांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने त्यांच्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

bjp mla chandrakant patil support for sambhaji raje fast
मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील

‘करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची‌ ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.‌ मात्र, यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या दैनंदिन चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, माथाडी कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची राज्य सरकारने तरतूद करावी’, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

‘राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्याला संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यामुळे राज्यातील फळभाजी विक्रेते आणि उत्पादक शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, माथाडी कामगार, कुक्कुटपालन व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या चरितार्थासाठी राज्य सरकारने आर्थिक तरतूद करावी’, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘रेशनिंगमधून सॅनिटायझर्स, मास्क द्या’

तसेच, गरीब कुटुंबातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगच्या दुकानांमधून सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, क्वॉरंटाईनमधून काही रुग्ण पळून जाण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा प्रकारे पळून जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. शिवाय, राज्यातल्या सर्व आयसोलेटेड आणि क्वॉरंटाईन रुग्णांची चांगली काळजी घेतली जात आहे, असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.


वाचा सविस्तर – पळून जाणाऱ्यांवर कारवाई करणार-अनिल देशमुख