विधानसभा निकाल हाती येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत ‘टफ फाइट’ दाखवली जात आहे. सरकार बनविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी बहुमताच्या जवळपास पोहोचल्यास फुटाफूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी ‘अलर्ट’ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीनं नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.
गुरूवारी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक बैठक पार पडली. जर महायुती आणि महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून आमदार फोडाफोडीची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांना बाहेर राज्यात पाठवण्यात यावे, अशी चर्चा बैठकीत झाली.
हेही वाचा : तुतारी अन् इंजिन, भालके की आवताडे, कुणाचा खेळ बिघडवणार? ‘ही’ गावेही ठरणार गेमचेंजर…
निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेसशासित राज्यांत पाठवण्यात यावे. जसे की कर्नाटक आणि तेलंगणा. शनिवारी सायंकाळपर्यंत निवडून आलेल्या आमदारांना बाहेर राज्यात पाठवण्यात येऊ शकते. याचा अर्थ महाविकास आघाडीचे आमदार निवडून येताच, त्यांना बाहेर राज्यात पाठवण्यात येणार आहे. या नेत्यांना तेव्हाच बोलावलं जाईल, जेव्हा सरकार बनविण्याचा दावा करण्यात येणार आहे. अथवा महायुती सरकार बनविण्याचा दावा करेल तेव्हा. जर, बहुमतासाठी काही आकडेवारी कमी पडत असेल, तर लहान पक्ष आणि अपक्षांशी महाविकास आघाडीकडून संपर्क केला जात आहे.
काँग्रेसच्या एक ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की, “आमचं सरकार स्थापन होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. एक्झिट पोल चुकीचे ठरणार आहेत. युती आणि आघाडी सत्तास्थापनेच्या जवळपास पोहोचल्यास आमदारांना शनिवारी सायंकाळी बाहेर राज्यात पाठविण्यात येणार आहे.”
मात्र, आमदारांना कोणत्या राज्यात पाठविण्यात येणार, हे स्पष्ट नाही. पण, तेलंगणा किंवा कर्नाटकात आमदारांना पाठवले जाईल. कारण, तेथील पोलिस प्रशासनाची मदत घेता येईल आणि हॉटेलचीही व्यवस्थाही होईल.
हेही वाचा : प्रणिती शिंदेंबाबत खालच्या पातळीची भाषा, काँग्रेसचा नेता भडकला; म्हणाले, “शरद्या कोळी, तुझी…”