मुंबई : माहिम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly Constituency) तिहेरी लढत होत आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपा छुपा पाठिंबा आहे. तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदा सरवणकर हे निवडणूक जिंकतील अशी शक्यता आहे. मात्र अमित ठाकरेंमुळे ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे. अशातच सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Mahim Assembly Constituency candidate Sada Saravankar criticizes Amit Thackeray)
सदा सरवणकर यांनी माहिम मतदारसंघात आज, रविवारी (17 नोव्हेंबर) रॅली काढली होती. ही रॅली शिवसेना भवनासमोरून जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माहिम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत भाजपा आमच्यासोबत आहे. भाजपाचे पदाधिकारी आमच्यासाठी काम करतील, अमित ठाकरे यांच्यासाठी नाही, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, सदा सरवणकर यांच्या वक्तव्याप्रकरणी अमित ठाकरे आणि मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागले.
हेही वाचा – MNS : …तेव्हा मी वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले; अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी अमित ठाकरेंवर निशाणा साधला होता. प्रिया सरवणकर यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन चेहरा राजकारणात उतरवला आहे, असे सांगितले जाते. ते त्यांच्या उमेदवाराला फ्रेश चेहरा म्हणत असतील तर हा फ्रेश चेहरा चित्रपटांसाठी ठीक आहे. पण त्याचे राजकारणात काय काम? कारण ते ज्या गल्लीत प्रचाराला जातात, तिथले पाच प्रश्नही त्यांना सांगता येत नाहीत. असा नवीन चेहरा कुणाला हवाय? मनसेने त्यांना प्रमोट करताना नवीन चेहरा असल्याचे म्हटले आहे. पण नेता म्हटले तर त्याला कर्तुत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व हवे. फक्त आडनाव असणे, हे कर्तुत्व असू शकते का? असा प्रश्न उपस्थित करत प्रिया सरवणकर यांनी सडकून टीका केली होती.
माहिम मतदारसंघात तिहेरी लढत
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यात तिहेरी लढत होत आहे. अमित ठाकरे यांचा प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सदा सरवणकर यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर हे देखील प्रचारात उतरले आहेत. याशिवाय महेश सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे नुकतेच माहिम मतदारसंघात येऊन गेले.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा