Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Ajit Pawar : घराणेशाही सर्वत्रच, निवडून येणे महत्त्वाचे; बारामतीबाबत अजित पवारांचे भाष्य

Ajit Pawar : घराणेशाही सर्वत्रच, निवडून येणे महत्त्वाचे; बारामतीबाबत अजित पवारांचे भाष्य

Subscribe

घराणेशाहीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही व्हायला लागली आहे. राजकारणात काम करणारी व्यक्ती 70 वर्षांची असते, त्यानंतर त्यांचा मुलगा-मुलगी, त्यांची मुले-मुली राजकारणात येतात. अशा पद्धतीने हे सुरू आहे. घराणेशाही, घराणेशाही म्हणत असले तरी त्या घरातील व्यक्तीला निवडून यावे लागते. मतदारसंघातून भरभक्कम मते घेऊन तुम्ही निवडून आलात तरच तुमचे काहीतरी महत्त्व आहे असे समजले जाते. तुम्ही पराभूत झालात तर तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे ते म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभेप्रमाणेच बारामतीवर सर्वांचे लक्ष खिळले आहे. बारामती मतदारसंघ हा पवार कुटुंबीयांचा अभेद्य बालेकिल्ला समजला जातो, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघाबरोबरच पवार कुटुंबही दुभंगले आहे. बारामतीत एका बाजूला अजित पवार तर दुसर्‍या बाजूला युगेंद्र पवार अशी पवार कुटुंबातच लढत होत आहे. भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांकडून प्रादेशिक पक्षातील घराणेशाहीवरून नेहमीच टीका केली जाते. त्यावर भाष्य करताना घराणेशाही तर प्रत्येक पक्षामध्ये आहे, पण जनतेतून निवडूनही यावे लागते, असे मत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. (NCP leader Ajit Pawar commented on Baramati constituency in a exclusive interview given to My Mahanagar)

‘आपलं महानगर-माय महानगर डॉट कॉम’ला अजित पवार यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही व्हायला लागली आहे. राजकारणात काम करणारी व्यक्ती 70 वर्षांची असते, त्यानंतर त्यांचा मुलगा-मुलगी, त्यांची मुले-मुली राजकारणात येतात. अशा पद्धतीने हे सुरू आहे. घराणेशाही, घराणेशाही म्हणत असले तरी त्या घरातील व्यक्तीला निवडून यावे लागते. मतदारसंघातून भरभक्कम मते घेऊन तुम्ही निवडून आलात तरच तुमचे काहीतरी महत्त्व आहे असे समजले जाते. तुम्ही पराभूत झालात तर तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे ते म्हणाले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, हा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत कायम आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या प्रमुखांची नावे चर्चेत आहेत. त्यातही अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्याबद्दल जाणून घेतले असता जोपर्यंत 145 चा आकडा पाठीशी उभा करीत नाही तोपर्यंत या पदासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मग 2029 च्या निवडणुकीत तरी मुख्यमंत्रीपद मिळेल का, असे विचारले असता प्रयत्नांती परमेश्वर, असे उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा – Ajit Pawar : लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार! अजित पवारांचा विश्वास

- Advertisement -

भाजपा आपल्या मित्रपक्षांना संपवते, असे म्हटले जाते. याबद्दल तुमचे मत काय? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, त्यांनी काय करावे हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. शिवाय प्रत्येक ठिकाणची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. तसे पाहायला गेले तर एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. एनडीए सरकार असताना त्या रेल्वेमंत्री होत्या. म्हणजेच प्रत्येकाने काही ना काही खाती सांभाळलेली आहेत आणि ते त्याबाबतीत काम करायला सक्षम आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या म्हणण्यात काही तथ्य नाही.

भाजपा आणि राष्ट्रवादीत वोट ट्रान्सफर होत नाही असे लोकसभेत दिसले. अशा स्थितीत महायुतीत राहून तुमचा फायदा होणार आहे का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, महायुतीमध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला पुढची कामे करता येत नाहीत याचा विचार केला पाहिजे. महायुती आहे म्हणूनच राजेंद्र येड्रावकर आपल्या मतदारसंघात काम करू शकले. ते जर नसते तर कसे काम करू शकले असते?

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा 

आपल्या निवडणूक अजेंड्याची माहिती देताना अजित पवार यांनी सांगितले की, महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लोकांसमोर जाताना ज्या योजना आम्ही आणल्या आहेत त्या समजावून सांगण्यावर आम्ही भर दिला आहे. या योजना पुढील 5 वर्षे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले पाहिजे. यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन आम्ही मतदारांना करतो. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ज्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहोत, त्या-त्या मतदारसंघांचा जाहीरनामा तयार केला आहे. पुढील 5 वर्षांच्या काळात आम्ही संबंधित मतदारसंघात काय करणार आहोत हे आम्ही यानिमित्ताने सांगितले आहे. यापूर्वी मतदारसंघनिहाय असा जाहीरनामा कधी तयार करण्यात आला नव्हता, पण आम्ही तो प्रयोग केला आहे. बारामतीच्या जाहीरनाम्यात तर गावनिहाय काय काम केले आणि पुढच्या 5 वर्षांत काय करणार आहे हे दिलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यांमुळे एक अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी मी जाहीर सभा घेत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद तरी चांगला दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांनी दोन बंडखोर नेत्यांना दाखवला घरचा रस्ता

चांगले उमेदवार देऊन सोशल इंजिनिअरिंग

सत्तेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्या दृष्टीने आम्ही विचारच केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे आमचे ध्येय आहे. चांगले उमेदवार देऊन सोशल इंजिनिअरिंग केले आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -