Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीसाठी आज मतसंग्राम; दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीसाठी आज मतसंग्राम; दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

Subscribe

सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची तितकीच अटीतटीची राजकीय लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची याशिवाय त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची तितकीच अटीतटीची राजकीय लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षासाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवयाची याचा फैसला राज्यातील जवळपास साडेनऊ कोटींहून अधिक मतदार आज करणार आहेत. (Political reputation of veteran leaders at stake in Maharashtra Assembly Election 2024)

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. राज्यभरातील 1 लाख 186 मतदान केंद्र आणि 241 सहाय्यक मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात एकूण 990 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदानासाठी 1 लाख 64 हजार 996 बॅलेट युनिट, 1 लाख 19 हजार 430 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 28 हजार 531 व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रांपैकी 67 हजार 557 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबवली जाणार आहे.

- Advertisement -

विधानसभा  निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांची अतिरिक्त कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – Assembly Election 2024 : मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त; मुंबईत 30 हजार पोलिसांची तैनाती

- Advertisement -

महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची याशिवाय त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरात एकाचवेळी मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रिया मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सज्जता केली आहे. मात्र, मतदानाच्या काही तास अगोदर राज्यात  घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटना आणि मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे घडलेले प्रकार लक्षात घेता निवडणूक आयोगासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा पट बदलला आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु, एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत बंड केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. पुढे  शिंदेंच्या नेतृत्वात युतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली. या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासारख्या छोट्यामोठ्या पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरू पाहत आहे.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election : रायगड जिल्ह्यातील 73 पैकी कोणत्या 7 उमेदवारांना मतदार निवडणार, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार

राजकीय नेत्यांचा कस लागला

पक्षफुटीचा तडाखा सहन कराव्या लागणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या आमदरांना धडा शिकविण्यासाठी दोघांनी कंबर कसली आहे. शरद पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघात कसोटी लागली आहे. पुतण्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आव्हान परतून लावण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावला आहे. बारामतीत शरद पवार गटाचे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील याचिका प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयातील लढाईत पूर्ण शक्ती लावली आहे. आघाडीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

महायुतीसमोर सत्ता राखण्याचे  आव्हान

भाजपाच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासमोर राज्यातील सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीत सार्वधिक जागा लढवत आहे. मी पुन्हा येईन अशी घोषणा देऊनही 2019 आणि त्यानंतर 2022 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी न मिळालेल्या फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी निर्णायक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखली आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर संधी मिळाली तर किंगमेकरच्या भूमिकेत राहता यावे, असा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यामुळे महायुतीच्या या तिन्ही नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक महत्वाची आहे.

हेही वाचा –  Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

राजकीय वारसदरांसाठी नेत्यांची प्रतिष्ठा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेश राणे, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ, काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव आशीष देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते, भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण, खासदार संदिपानराव भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आदी राजकीय वारासदारांसाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीमधील प्रमुख पक्ष आणि उमेदवारांची संख्या

  1. भाजपा – 149
  2. शिवसेना शिंदे गट – 81
  3. राष्ट्रवादी अजित पवार गट – 59
  4. काँग्रेस – 101
  5. शिवसेना ठाकरे गट – 95
  6. राष्ट्रवादी शरद पवार गट – 86
  7. वंचित बहुजन आघाडी – 200
  8. मनसे – 125
  9. अपक्ष उमेदवार – 2 हजार 86
  10. एकूण उमेदवार – 4 हजार 136

गेल्या तीन निवडणुकीतील मतदान

2019 – 67.09 टक्के
2014 – 62.49 टक्के
2009 – 59.05 टक्के

हेही वाचा – Dharavi Redevelopment : अदाणींना धारावी प्रकल्पात रसच नव्हता…शरद पवारांनी काढली ठाकरे – गांधींच्या आरोपातील हवा

मतदारांविषयी

  1. पुरुष मतदार – 5 कोटी 22 हजार 739
  2. स्त्री मतदार – 4 कोटी 69 लाख 96 हजार 279
  3. तृतीयपंथी मतदार – 6 हजार 101
  4. दिव्यांग – 6 लाख 41 हजार 425
  5. सेना दलातील मतदार – 1 लाख 16 हजार 170
  6. एकूण – 9 कोटी 77 लाख 82 हजार 714

Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -