मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मनसे भाजपाबरोबर जाणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसे भाजपासोबत सत्तेत बसणार का? मनसेला सोबत घेण्याबाबत महायुतीतील इतर पक्षांची भूमिका काय असू शकते? खासदार श्रीकांत शिंदे यांना कायम टीकेचे लक्ष्य का केले जाते? अशा प्रश्नांची उत्तरे दिली आहेत मनसेचे विद्यमान आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी. ‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात तुम्हाला ऑफर आली होती का?
माझी निष्ठा राज ठाकरे यांच्यापाशीच असल्याने सत्ताबदलावेळी मला ऑफर देण्याची कुणाची हिंमत झाली नाही, पण राजकारणाचा ट्रेंड बदलत गेल्यावर एक-दोन ऑफर आल्या. त्या ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. माझा फोकसच राजसाहेब आहेत. ज्या दिवशी अशी वेळ येईल तेव्हा राजकारण सोडून देईन. सत्तेसोबत किंवा भाजपसोबत जावं हा विचारच मनाला शिवत नाही. सक्षम विरोधक म्हणून राज ठाकरे यांनी मते मागितली होती तेव्हा लोकांनी मला निवडून दिले. आता राज ठाकरे म्हणतात की, सत्तेत बसणार आहोत, त्यानुसार सत्तेत बसू.
मनसेने वारंवार आपली भूमिका बदलल्याचे दिसते…
मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, ही मनसेची स्पष्ट भूमिका आहे. ही भूमिका राज ठाकरे यांनी सोडल्याचे कोणाला दिसले का? या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. ती पुढे नेत असताना राजकारणात काही पापग्रह असतात, ते पुढे येतात. हा मनसेचा वैचारिक गोंधळ असल्याचे मानत असू तर उद्धव ठाकरे यांनी जे केले त्याला काय म्हणणार? लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला तेव्हा विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा कोणता चेहरा होता? राज ठाकरे यांनी देशाच्या भल्याच्या दृष्टीने उदात्त भावनेने पाठिंबा दिला होता.
हेही वाचा – Raju Patil : शिंदे गटाविरोधात आमच्या मनात राग; माहिम मतदारसंघावरून प्रमोद (राजू) पाटलांचा संताप
मनसे भाजपाची बी टीम असल्याची टीका केली जाते…
आजही आम्ही भाजपासमोर निवडणूक लढवत आहोत. 2019ला राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओ, या जाहीर सभा झाल्याच होत्या. तेव्हा आम्ही विरोधकांची बी टीम होतो का? राज ठाकरे जनमानसाचा कानोसा घेतात. लोकांसोबत राहिले पाहिजे असे ते मानतात. त्यावेळी पुलवामासारख्या घटना घडल्या. त्या राज ठाकरे यांना पटत नव्हत्या. ते उघडपणे बोलले. एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करणे म्हणजे ती भूमिका नव्हे. पक्षाचा एक अजेंडा असतो. त्यापासून फारकत घेत आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या पक्षांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिका आहेत.
भाजपाबरोबर तुम्ही सत्तेत असणार का?
भाजपा आणि मनसे यांची सत्ता असणार हे वाक्य अर्धवटच दाखवले जाते. सत्तास्थापनेसाठी पुरेसे उमेदवार रिंगणात नसताना सत्तेत जाणार असे कशाच्या भरवशावर तुम्ही बोलत आहात, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असताना दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम केल्यामुळे किंवा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालल्यामुळे असेल, मला सर्वात जवळचा पक्ष भाजप वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी उत्तर दिले होते. त्यातही भाजप पुन्हा सत्तेत येईल अशी परिस्थिती दिसत आहे. अशा वेळी आम्ही भाजपसोबत जाणार आहोत. आमच्या आमदारांची संख्या दखल घेण्यासारखी असेल आणि आमच्याशिवाय कोणी सत्तेत बसू शकणार नाही.
हेही वाचा – Ajit Pawar : महायुतीच्या सभेला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ; नेमकं कारण काय?
भाजप पुन्हा सत्तेत येणार याची खात्री आहे?
आज ठाकरे गटाला मत म्हणजे अबू आझमी यांना मत दिल्यासारखे आहे. ज्या प्रकारे लोकसभेला ही लोक एकवटलेली, ते पाहता महाराष्ट्राला काय खड्ड्यात घालायचे आहे का? असा प्रश्न उभा राहतो. आज महाराष्ट्र वाचवायचा असेल किंवा हिंदुत्वाच्या विचाराने चालवायचा असेल तर त्या दृष्टीने लोकांचा विचार सुरू असल्याचे जनमनाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येते. लोकसभेचा पॅटर्न जनता विसरलेली नाही.
राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये चालले आहेत, मग भूमिपुत्रांचे काय?
गुजरात आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची तुलना करता येणार नाही. आजही महाराष्ट्र नंबर वन आहे. सत्तेत पाठिंबा देऊन महाराष्ट्रात आणखी उद्योग कसे आणायचे हे राज ठाकरे बघतील. मिसहॅण्डलिंगमुळे एक-दोन उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. येथे उद्योग का येत नाहीत, उद्योग बाहेर का जात आहेत? काही प्रॉब्लेम आहे का? यासाठी राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालायला पाहिजे. आपले कोणी टक्केवारी मागत आहेत का, हेही पाहायला पाहिजे.
हेही वाचा – Shiv Sena UBT : पंतप्रधान मोदी – फडणवीसांचे दावे फसवे; दानवेंनी विचारले पाणी 9 दिवसाला येते की नाही?
याचा अर्थ राज्यकर्ते टक्केवारी घेताहेत?
आताचे सत्ताधारीही टक्केवारीवरच जगत आहेत. कल्याण-शिळफाटा रोडचा दर्जा चांगला नाही. याबाबत विधिमंडळात मी आवाज उठवला होता. व्हीजेटीआयकडून त्याचे ऑडिट झाले. या ऑडिट रिपोर्टमध्ये 64 पॅनल खराब दाखवले. त्यातले 32 पूर्ण तोडून बनवायला लागले. अजूनही त्याची क्वालिटी चांगली नाही. यावर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर नेते का बोलत नाहीत? यात खुद्द खासदारांचा सहभाग आहे असा माझा संशय आहे. पलावा पूल, पत्रीपूल, दिव्याचा पूल यांचे काम एकाच ठेकेदाराला दिले. कामे कशी चालली आहेत ते दिसत आहे. एलएनटीसारखी एखादी चांगली कंपनी येथे का नाही येऊ शकत? अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी डोंबिवलीहून शिळफाट्याला जाणार्या पलावाच्या दुसर्या पुलाचे 3 पिलर रस्त्यावर आणले आहेत. ही बांधकामे एकदा तोडलीही होती. अटल सेतू झाला, पण आमचा पलावा पूल होत नाही. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत.
मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे का?
दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांच्या (श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे) मतदारसंघांमध्ये कोविड काळात घोटाळे झाले आहेत, पण याबाबत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ आहे. कोविड सेंटर, पीपीई किट्स, औषधे, बेड्स या सर्वांच्या दरात तफावत होती. ठरलेले ठेकेदार होते. ब्लॅक फंगस जगभरात दिसला का? पण आपल्याकडे होता. इंडस्ट्रीयल ऑक्सिजन देऊन लोकांना मारले. महामारीच्या भयाने लोकांनी त्यावेळी हे बघितले नाही. ना मला टक्केवारी हवी आणि ना मला खासदारकीची निवडणूक लढवायची आहे, पण 2014 ची निवडणूक श्रीकांत शिंदे अजून विसरले नाहीत. आम्ही त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली नव्हती, पण विजयही सहजासहजी मिळू दिला नाही. त्याचा कुठेतरी त्यांना राग आहे. एकनाथ शिंदे संबंध चांगले जपतात. राजकारण आले की कठोरपणे ते राजकारण करीत असतात. त्यांच्यातील 5 टक्के गुण जरी उतरले तरी श्रीकांत शिंदे इथले लोकनेते होतील. नव्या उमेदीच्या नेत्यांना हेच सांगेन की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासारखे वागू नका. राजकारणात सर्वांशी मैत्री असली पाहिजे.
राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतपेटीत दिसत नाही…
हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही घडले आहे. सध्या नुसत्या विचारांवर मते मिळत नाहीत, तर थेट संपर्क, उपलब्धता देखील पाहिली जाते. निवडणुकीच्या वेळी कोणी काय केले याचा विचार करून मतदान केले जाते. राज ठाकरे यांचे विचार लोकांनी हातात घ्यायला पाहिजेत. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती आणि आता ती ओसरत असून लोकसभा निवडणुकीत ते दिसले. प्रत्येक वेळी आम्ही एकटेच लढत आहोत. सर्व पक्ष युती आणि आघाडी करून लढत आहेत. मनसेला मते मिळत नाहीत म्हणून जे खिजवतात त्या पक्षांनी हिंमत असेल तर एकटे लढून दाखवावे. मग दूध का दूध आणि पानी का पानी होईल.
शब्दांकन : मनोज जोशी