मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले आहे. विनोद तावडे येणार असल्याची माहिती भाजपामधील काही लोकांनीच मला दिल्याचे वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विनोद तावडेंबद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यानेच हितेंद्र ठाकूरांना टीप दिल्याचा दावा केला आहे. (Sanjay Raut claims that a top BJP leader tipped off Hitendra Thakur about Vinod Tawde)
हितेंद्र ठाकूर यांच्या बोलण्याला दुजोरा देताना संजय राऊत म्हणाले की, ठाकूर खरं बोलत आहेत. माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार विनोद तावडे यांच्याबद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यानेच हितेंद्र ठाकूर यांना माहिती दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील, ते बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे, त्यांच्या हातात सूत्र आहेत. मोदी-शाहांच्या जवळचे ते आहेत. त्यामुळे त्यांना या पद्धतीने पकडून द्यावं, यासाठी भाजपातकडून कारस्थान झाले. भाजपामधील बहुजन समाजाचं एक नेतृत्व पुढील निवडणुकीत अस्तित्व राहू नये, म्हणून देखील हा खेळ झाला असावा, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि ते जाळ्यात सापडतील, यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला, असे मला वाटते. त्यामुळे आता विनोद तावडे कांडामुळे भाजपामधील काही लोक आनंद व्यक्त करत असतील. ज्यांच्याकडे गृहखातं आहे, त्यांना यासंदर्भात जास्त माहिती असते. असे म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये काय घडले?
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हातामध्ये एक लाल रंगाची डायरी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, हे नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओमध्ये बविआचे कार्यकर्ते हे भाजपा नेते विनोद तावडे यांच्याकडून काळ्या रंगाची बॅग खेचत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विवांता हॉटेलमध्ये वबिआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत विनोद तावडे यांना घेराव घातला. ज्यानंतर तावडेंनी त्या ठिकाणाहून निघून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र बविआच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना तिथून जाऊ न देता तुम्ही इथे नेमके कशाला आलात? हा तुमचा मतदारसंघ नाही आणि बाहेरच्या नेत्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मतदारसंघात यायचे नसते, हे नियम माहीत नाही का? असा प्रश्न बविआच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोर उपस्थित करण्यात आला. तसेच, या राड्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटे फाडत 500 रुपयांच्या नोटाही दाखवल्या.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी राऊतांची टीका