मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून उद्या, सोमवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आता आपल्या दोन बंडखोर नेत्यांवर कारवाई करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. (Sharad Pawar suspended Rahul Jagtap and Raju Timande from the ncpsp)
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचे नेते राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जागेवर कोणाला संधी द्यायची, यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर अजित गटाकडून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राहुल जगताप नाराज झाले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांच्यावर शरद पवार गटाकडून निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – Baramati : टेक्स्टाईल पार्क उभारणाऱ्यांच्या पत्नीलाच अडवता; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा
राजू तिमांडे यांनाही दाखवला घरचा रस्ता
दरम्यान, महायुतीकडून हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना तिकीट मिळाले. मात्र शरद पवार गटाकडून माजी आमदार राजू तिमांडे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलकेला. मात्र आता त्यांच्यावरही शरद पवार गटाने कारवाई केली आहे. राजू तिमांडे यांना निलंबित करत शरद पवार गटाने त्यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे.