मुंबई : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी विशेष मुलाखत घेतली. विधानसभा निवडणुकीचे निकाल काय असतील? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीतील प्रभाव कितपत असेल? सत्तेत पुन्हा आल्यावर कोणत्या प्रकल्पावर भर देणार? मनसेबरोबरच्या लढतीचे चित्र काय असेल? विविध प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांना काय उत्तर द्याल? अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. (Shiv Sena MP from Kalyan Srikant Shinde targeted the opposition in an exclusive interview to My Mahanagar)
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील वातावरण महायुतीला पोषक आहे का?
मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. खूप चांगले वातावरण आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी मी जवळपास 60-70 विधानसभा मतदारसंघांचे दौरे केले होते. आता प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मतदारसंघांत जातो, तिथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी, ज्यांना 7.5 अश्वशक्तीपर्यंतचे वीजबिल मोफत केले आहे, ते शेतकरी यांचा प्रामुख्याने सहभाग दिसतो. त्यांना पीक विम्याचे, सोयाबीनचे पैसे मिळत आहेत. नेवासेमध्ये असताना गेल्या सव्वादोन वर्षांत आम्हाला सरकारच्या माध्यमातून काय-काय लाभ मिळाले, याची जंत्रीच लोकांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत मोदी सरकारकडून शेतकर्यांना 6 हजार रुपये दिले जात होते, त्यात राज्य सरकारने आणखी 6 हजार रुपयांची भर घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ज्या प्रकारे काम करत आहेत, ते लोक पाहात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेवरच भर का दिला जात आहे?
इतर राज्यांनीही अशा योजना आणल्या होत्या. पण यात सर्वांना यश मिळतेच, असे नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही सुपरडुपर हिट योजना लागू झाल्याबरोबर घराघरांत पोहोचली. अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचली. याशिवाय, मुख्यमंत्री शिंदे 18-20 तास काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य प्रगती करत आहे. मुंबईमध्ये तुम्हाला विकास पाहायला मिळेल. मुंबई सारखी बदलत आहे. कोस्टल रोड, एमटीएचएल (अटल सेतू), मेट्रो सेवा, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसह एमएमआरचा विकास आणि त्याच्याबरोबरीने शेतकर्यांसाठी निर्णयही महायुती सरकारने घेतले आहेत. मुख्य म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्याशी सहज संपर्क साधता येतो आणि ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. आज ते मुख्यमंत्री असूनही एका कार्यकर्त्यासारखे काम करतात. या सर्व गोष्टींचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतो आहे.
हेही वाचा – Shrikant Shinde : ठाकरे गट भरकटलाय; खासदार श्रीकांत शिंदे यांची जहरी टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तुमचा मुख्य विरोधी पक्ष आहे का?
विरोधक हा विरोधक असतो. त्यात साधा आणि मुख्य असे काहीही नसते. महाविकास आघाडी विरोधक आहे. म्हणून आम्ही आमने-सामने निवडणूक लढत आहोत. महाविकास आघाडी हीच आमची राजकीय विरोधक आहे.
मनसेनेही शिवसेनेविरोधात 16 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. याकडे तुम्ही कसे बघता?
निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवतात. मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक ही निवडणुकासारखीच लढली पाहिजे.
माहिममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक रिंगणात आहेत. तेथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेही निवडणूक लढवत आहेत. तिथे काय चमत्कार होईल असे वाटते?
माहिमचे नागरिक ठरवतील की कोणाला मत द्यायचे. लोकांच्या सुखदु:खात जो धावून जातो, लोकांसाठी जो उपलब्ध असेल, लोकांसाठी जो काम करेल त्यालाच लोक निवडून देतील. सदा सरवणकर यांच्यासारखा कार्यकर्ता गेली 15 वर्षे मतदारसंघामध्ये काम करत आहे. दिवसरात्र लोकांसाठी उपलब्ध असतात. लोक पुन्हा एकदा सदा सरवणकर यांना निवडून देतील, असे मला वाटते.
कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेच्या राजू पाटील यांनी मदत केली होती, पण आता त्यांच्याविरोधात कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने उमेदवार दिला आहे…
लोकसभेत मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेसाठी युती झाली नाही. केवळ शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनच पक्षांची युती आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियादेखील आहे. अशा परिस्थितीत मनसेनेही आमच्यासमोर उमेदवार उभे केले आणि आम्हीही केले.
मुंबईत भाजपाच्या अनेक उमेदवारांविरुद्ध मनसे रिंगणात उतरलेली नाही. मात्र, शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिलेले आहेत…
हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारत आहात. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.
शिवसेनेच्या 85पैकी जवळपास 49 जागांवर ठाकरे गटाचा सामना बघायला मिळणार आहे. तिथे तुमचा स्ट्राइकरेट काय असेल?
एकदम चांगला स्ट्राइकरेट राहील. जास्तीत जास्त जागा शिवसेना जिंकेल.
हेही वाचा – Sharad Pawar : जाहीर सभेत शरद पवारांनी महिला मुख्यमंत्रीपदाबाबत केले मोठे वक्तव्य
महायुतीत सर्वात जास्तीत जागा भाजपा लढवत आहे. शिवाय, तुमच्या 10 जागांवरही त्यांचेच उमेदवार आहेत. मग त्यांचाच स्ट्राइकरेट जास्तच राहील ना?
या जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यांना काही अर्थ नसतो. जे उमेदवार जिंकणार आहेत, त्यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वीही अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यांचे काही उमेदवार आमच्याकडे येऊन लढले, आमचे त्यांच्याकडून लढत आहेत. शेवटी महायुती सत्तेत पुन्हा कशी येईल, याची ही रणनीती आहे. त्यातही एखादी व्यक्ती पक्षात आल्यानंतर तिथेच राहते, त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
बाळासाहेब भाजपाबद्दलही बोलले होते की, कमळाबाईला वरचढ होऊ देणार नाही… भाजपा तुमच्यापेक्षा वरचढ आहे, असे वाटते का?
कोण वरचढ, कोण छोटा, कोण मोठा या सर्व गोष्टी आम्ही बाजूला ठेवल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आले पाहिजे, यासाठी आम्ही लढत आहोत. सर्वांनाच सन्मानपूर्वक वागणूक मिळताना, सर्व पाहात आहेतच. म्हणूनच 85 जागा आम्ही लढत आहोत.
अजित पवार यांना सोबत घेतल्याने लोकसभेत नुकसान झाले आणि विधानसभेतही नुकसान होईल, असे म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते?
बिल्कुल नाही. आज आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवत आहोत. तिन्ही पक्ष, तिन्ही नेते चांगले काम करत आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसेल.
तुमच्याबरोबर महाशक्ती होती आणि तुम्ही पुन्हा सत्तेत आलात ना?
राजकारणात जर आणि तरच्या गोष्टी नसतात. राजकारणात भविष्यवाणीही कोणी करू शकत नाही. आम्हाला पटले नाही, म्हणून आम्ही निघून गेलो. पुढे काय होणार आहे, हे कोणाला माहीत नव्हते.
विधानसभेनंतर शिवसेनेच्या भवितव्याबाबत तुम्हाला काय वाटते?
भविष्य करणारा मी कोणी ज्योतिषी नाही. पण एकच सांगू शकतो की, जे अपार कष्ट एकनाथ शिंदे करत आहेत आणि लोकांचा जो विश्वास आहे, चांगली कामगिरी आहे, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही आमचा चांगला स्ट्राइकरेट राहील.
मुख्यमंत्रीपदाच्या दृष्टीने उमेदवार जास्त निवडून येणे महत्त्वाचे आहे की स्ट्राइकरेट?
महायुतीचे सरकार पुन्हा आले पाहिजे, हेच आमचे उद्दिष्ट्य आहे. ज्या योजना आणि विकासाची कामे आम्ही सुरू केली आहेत, ती आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो. गेल्या सव्वादोन वर्षांत लोकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यापेक्षा चांगले काम पुढील पाच वर्षांत करायचे आहे. म्हणून पुन्हा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पाहिजे.
मु्ख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर, ही शर्यत महाविकास आघाडीमध्ये आहे. कधी काँग्रेसचा नेता उठतो आणि सांगतो, मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा. ठाकरे गटाचे नेते सांगतात, मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा. तर, ज्याचे जास्त उमेदवार जिंकून येतील, त्याचाच मुख्यमंत्री होईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. मला असं वाटते की, लोकांशी देणेघेणे नाही. सत्ता कशी येईल, मुख्यमंत्री कोण होईल, याच्याशीच त्यांना देणेघेणे आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याची धुरा सांभाळावी, असे तुम्हाला वाटते का?
मुलगा म्हणून आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला तसे वाटते. माझा नेता सर्वोच्च पदावर गेला पाहिजे, असे पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यत नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याचा निर्णय होईल. त्यातही लोकांचे प्रश्न, दु:ख दूर करण्यामध्ये आम्हाला जास्त समाधान आहे.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : पवारांनी जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री केले तरी…; ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट
तुमच्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांनी शिवसेनेच्या उमेदवारांना का निवडून द्यावे?
गेल्या सुमारे 10 वर्षांत एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कळवा-मुंब्रा या भागांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात मी यशस्वी झालो. गेल्या सव्वादोन वर्षांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन सर्वच मतदारसंघांमध्ये मोठा बदल झाला. शिवाय, माझ्या मतदारसंघात सर्वाधिक रेल्वेची कामे झाली. सर्व रस्ते सिमेंट-कँक्रिटचे होत आहेत. अंबरनाथमध्ये 100 टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. मेट्रोचे काम खूप वेगाने सुरू आहे. नो कॅश काऊंटर्स रुग्णालये सुरू करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. इतरही अनेक कामे या मतदारसंघामध्ये करण्यात यशस्वी झालो. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लोकांनी मला जास्त मताधिक्क्याने निवडून दिले. तसेच, विधानसभेतही महायुतीच्या उमेदवारांना लोक निवडून देतील.
पुन्हा सत्तेत आल्यावर असे कोणते प्रकल्प आहेत की, ते हाती घ्यावे लागतील?
मुंबईत सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तो घरांचा. ठाकरे गटाने गेली अनेक वर्ष पालिकेत सत्ता उपभोगली, पण लोकांना ते घर देऊ शकले नाहीत. मुंबईतील सर्व रखडलेले प्रकल्प सरकारकडून हाती घेतले जातील. त्यांची जबाबदारी सरकार घेईल. सरकार लोकांना घरे बांधून देईल. एसआरए प्रकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून लोक बाधित आहेत. गेल्या 15-20 वर्षांपासून ट्रान्झिट कॅम्पमध्ये ते राहात आहेत. याशिवाय, म्हाडाच्या इमारती, इमारतींचा पुनर्विकास हे मुद्दे आहेतच. या लोकांना वाली कोण? या लोकांना घर कोण देणार? लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे.
मुंबई सोडून गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आला पाहिजे. त्याची घरवापसी झाली पाहिजे. मुंबईकराला स्वत:चे घर मिळाले पाहिजे. म्हणूनच आम्ही एसआरए प्रकल्पांचा प्रश्न हाती घेतला. एसआरए आणि एमएमआरडीए असा एक प्रयोग आम्ही केला. म्हणजेच, एसआरए प्रकल्प विकासकाच्या हाती असतो. तो कधी घरे बांधून देईल आणि लोक तिथे कधी राहायला जातील, हे सर्व त्या विकासकावर अवलंबून आहे. प्रकल्प रखडवणार्या विकासकाला बाजूला करून त्यात एमएमआरडीए आणली. म्हणजे, त्यात सरकार सहभागी झाले. घाटकोपरच्या 16 हजार घरांचा प्रश्न सरकारने सोडवला. आता दोन वर्षांत ही घरे एमएमआरडीए बांधून देणार.
वरळीतील बीडीडी चाळीचा प्रश्न होता. हा मतदारसंघ कोणाचा आहे, ते माहीतच आहे. पण ते (आमदार आदित्य ठाकरे) प्रश्न सोडवू शकले नाहीत. 50 लाखांत त्यांना घर द्यायचे होते. आमचे सरकार आल्यानंतर त्या लोकांना 15 लाखांमध्ये घर दिले. हा 50 लाख आणि 15 लाख रुपयांतील तफावत कोणाच्या घरी जात होता?
एमएमआरमध्ये विकासकामे जास्त होणार आहेत. रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे एक टर्मिनल एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. मुंबईमध्ये आऊटररिंग रोडचा कोणी विचार केला नव्हता. ठाणे आणि मुंबई या आऊटर रिंगरोडने कनेक्ट होत आहे. कोस्टल रोड आता वसई-विरारपर्यंत जाणार आहे. माझ्या मतदारसंघात नवी मुंबई विमानतळ ते बदालपूरपर्यंत अॅक्सेस कंट्रोल रोड करत आहे. हा सर्व शहरांना समांतर असा रस्ता असेल. शहराच्या बाहेर पडण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागली पाहिजे, असे नियोजन करत आहे.
हेही वाचा – Priyanka Gandhi : महायुतीच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर; प्रियंका गांधींनी साधला निशाणा
कोस्टल रोड पालिकेने बनवला आणि अटलसेतूचे 90 टक्के काम उद्धव ठाकरे असतानाच झाल्याचा दावा करण्यात येतो…
अटलसेतूचे 90 टक्के काम झाल्याचे फोटो आहेत का?
पण तसा आरोप करण्यात येतो…
आरोप करत आहेत, तर करू द्या. आरोप करणार्यांना फक्त आरोपच करायचे आहेत. अडीच वर्षांत काय काम केले ते समोरासमोर येऊन सांगितले पाहिजे. अडीच वर्षांत तुम्ही काय केले आणि सव्वादोन वर्षांत आम्ही काय केले हे लोकांसमोर आणूया, असे आम्ही वारंवार आवाहन करत आहोत. अडीच वर्षांत तुमचा कारनामा काय होता आणि आम्ही काय-काय कामं केली, हे लोकांना कळू द्या. आधी सव्वादोन वर्षांत कोस्टल रोड दिसतही नव्हता, पण नंतर त्याचे काम गतीने झाले. यानंतर कोस्टल रोडच्या वेगवेगळ्या मार्गिका, पूल यांचे उद्घाटन आमच्या सरकारने केले. यांनी फक्त अडवाअडवीची कामे केली. मेट्रो आणि बुलेट ट्रेनचे काम अडवले. मेट्रो कारशेडला अडवल्यामुळे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग आला. मुंबई आणि परिसरात मेट्रोचे जाळे किती वेगात वाढत आहे, ते पाहा. यांनी विविध प्रकल्पांमध्ये घातलेला खोडा आम्ही बाजूला केला आणि लोकांचा प्रवास कसा सुरळीत होईल, यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.
हेही वाचा – Congress : राहुल गांधींनी सूचना दिल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…
काही प्रकल्पांच्या बाबतीत मूळ किमतीपेक्षा जवळपास 80 टक्के वाढीव खर्च होत आहे. पुण्याच्या रिंगरोडबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनी हा आरोप केला आहे…
फक्त आरोप नको, पेपर दाखवून बोलले पाहिजे. काहीही आरोप केले जातात. समोर येऊन बसा आणि चर्चा करा, असे आमचे आरोप करणार्यांना सांगणे आहे. अगोदरचे टेंडर आणि आताचे टेंडर हे घेऊन बसले पाहिजे. वायफळ चर्चा करण्यात काय अर्थ आहे. जे नियम आहेत, त्यानुसार हे प्रकल्प सुरू आहेत. उलट, यांच्या हट्टामुळे प्रकल्प रखडले. एका बाळहट्टामुळे मेट्रोच्या कारशेडचा प्रश्न इतकी वर्ष रखडला. 10 हजार कोटीने खर्च वाढला आहे, तो कोणाच्या खिशातून जाणार आहे? त्यांच्या खिशातून जाणार आहे. ते कोणाला द्यायचाही विचार करू शकत नाहीत.
एकनाथ शिंदे हे नाव वगळले तर एवढं प्रेम तु्म्हाला मिळेल का?
आपल्याला जी क्रेझ बघायला मिळते आहे, ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. एकनाथ शिंदे जी मेहनत करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. हे प्रेम सहजासहजी मिळत नाही. नेत्याला घडवण्याचे काम पूर्णपणे कार्यकर्ता करत असतो. त्या कार्यकर्त्याबरोबर आपुलकीने, एका परिवारासारखे राहावे लागते. जोपर्यंत त्याच्याशी तुमची अटॅचमेन्ट होत नाही, तोपर्यंत हे प्रेम मिळत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर आमची नुसती अटॅचमेन्ट नसून एका परिवाराच्या सदस्यासारखे ते आहेत. म्हणून कमी कालावधीमध्ये खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे.
हेही वाचा – Shinde vs Thackeray : अशा कोणाच्याही धमक्यांना मी…; दापोलीत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांच्यातील काही गुणांचे कौतुक राजकीय विरोधकही करतात, तुम्हाला त्यांचे कोणते गुण भावतात?
अपार मेहनत. ते अतिशय कष्ट करतात. त्यांच्यात जिद्द आहे. एखादी गोष्ट करायची असले तर, त्यात पूर्ण ताकदीने स्वत:ला झोकून देतात. त्यांच्या कामाची पद्धत लहानपणापासून बघत आलो. दिवसरात्र फक्त पक्षवाढीसाठी त्यांनी काम केले. पक्षसंघटना, पक्षबांधणी आणि राजकारण… त्यांना दुसरी कोणतीच गोष्ट येत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते 18-20 तास काम करतात. त्यामुळेच दोन वर्षांत या टप्प्यावर आम्ही पोहोचलो आहोत. लोकसभेत सात खासदार आहेत. राज्यसभेत एक सदस्य आहे. तीन विधान परिषद सदस्य आहेत. विधानसभेतही 85 जागा लढवत आहोत. लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते जोडले गेले आहेत. हे घरी बसून सहजासहजी झाले नसते. यासाठी अपार कष्ट घेतले गेले. कठोर परिश्रमाशिवाय तुम्हाला काहीच मिळू शकत नाही.
वेगवेगळ्या योजनांमुळे राज्याच्या कर्जामध्ये वाढ होत आहे. परिणामी कर्मचार्यांच्या पगारासाठी पैसेही राहणार नाहीत, असे सांगितले जाते…
लोकांची दिशाभूल केली जात आहे. महाराष्ट्र हे बलाढ्य राज्य आहे. जे राज्य संपूर्ण देशाला चालवते. जीडीपीच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात येत आहेत. एफडीआय 52 टक्के आहे.
हेही वाचा – Dhananjay Munde : मीच ‘तुतारी’च्या एका नेत्याला फोन लावला अन्…; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
उद्योगधंदे बाहेर गेले ना?
कुठे गेले? तुम्हीही विरोधकांची भाषा बोलू नका. उद्योगपतींच्या घराखाली स्फोटक लावणार, जिलेटिन स्टिक्स ठेवणार, तेव्हा उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर जाणार की महाराष्ट्रात राहणार? त्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेची पाठराखण केली गेली. तो ओसामा बिन लादेन आहे का, असे कोण म्हणाले होते? निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनीही खूप गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण पुरावे लपवून ठेवण्याचे काम राज्य सरकार करत होते, असे त्यांनी म्हटले आहे. वाझेने खूप जणांची नावे घेतली आहेत. अगोदरच्या गृहमंत्र्यांच्या मुलाचे चॅट आहेत. अडीच वर्षाच्या कारभारात त्यांनी हे कारनामे केले आहेत. त्यामुळे उद्योगधंदे बाहेर गेले. पण आता आमचे सरकार असताना 52 टक्के विदेशी गुंतवणूक आली आहे. आम्ही धोरण बदलले, लोकांना विश्वास दिला, त्याचा हा परिणाम आहे. मविआ सरकारच्या काळात तिसर्या क्रमांकावर घसरलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि कर्नाटक आपल्या मागे आहे.
लोकसभेतील विजयानंतर मंत्रिपद नाकारले…
पक्षामध्ये वरिष्ठ नेते आहेत, जे पक्षवाढीसाठी गेली अनेक वर्षं काम करत आहेत. प्रतापराव जाधव हेही वरिष्ठ नेते आहेत. मी सुद्धा तीन टर्मचा खासदार होतो. मला सर्वजण मंत्रिपद घ्यायला सांगत होते. पण मला त्यामध्ये जास्त रस नाही. मला पक्षबांधणीमध्ये जास्त रस आहे. लोकांना कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे. त्यांच्याशी संपर्क असला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. मंत्रिपदाच्या ओढीतून अडीच वर्षांपूर्वी हीच दरी निर्माण झाली होती. इतिहासामधून काहीतरी शिकले पाहिजे.