मुंबई : मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये येऊन पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता मुंबईत आल्यावर माध्यमांशी संवाद साधताना विनोद तावडे म्हणाले की, पैशाचे सर्व आरोप खोटे, त्याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. (Vinod Tawde says no case has been registered in connection with the distribution of money)
काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह टीका करणाऱ्या नेत्यांची वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. मी 40 वर्षे राजकारणात आहे. कधी एक दमडी वाटली नाही. हितेंद्र ठाकूर यांचं मत मी विधान परिषदेत मिळवलं आहे. नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर यांनी मला सोडलं आहे. त्यामुळे त्यांना शंका आली असेल तर मी एवढंच म्हणेन की, निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करावी, अशी भूमिका तावडे यांनी स्पष्ट केली.
तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे? असा प्रश्न विचारला असता विनोद तावडे म्हणाले की, तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिलं म्हणजे आम्ही दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली म्हणून. दुसरं म्हणजे मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो आणि तिसरा गुन्हा म्हणजे हितेंद्र ठाकूर त्यांचा मतदारसंघ नसताना तिथे आले. फक्त हे तीन गुन्हे दाखल झाले आहे. पैशासंदर्भात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पैशाच्या सर्व बातम्या खोट्या आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली. यावर त्यांना विचारण्यात आले की, हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे की, मला भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली आहे. याप्रकरणी विचारले असता, विनोद तावडे म्हणाले की, त्यांनी केलेले वक्तव्य धाधांत खोटे आहे. त्यांच्यासोबत गाडीत जाताना ते काय म्हणाले हेही मला माहित आहे. त्यामुळे या आरोपात काहीही तथ्य नाही.
हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा
प्रचार संपलेला असतानाही तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता? असे विचारले असता विनोद तावडे म्हणाले की, प्रचार संपल्यानंतर मी लोकांना भेटत असतो. मी राजन नाईक यांना फोन केला, त्यांना काम कसं सुरू आहे. यावर त्यांनी मला सांगितलं की, चांगलं चालंल आहे आणि मला चहाला यायला सांगितलं. म्हणून मी चहाला गेलो. युती असताना मी आणि उद्धव ठाकरे रात्री शाखांमधून फिरलो आहे. ही गोष्ट सर्वच करत असतात. तरीही शंका आली आहे, मग पैसे तपासा, त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासा किंवा आणखी काही करायचे ते करा, माझं काहीच म्हणणं नाही.
ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र
दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या तुम्ही शर्यतीत आहात, म्हणून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न विचारला असता विनोद तावडे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीबद्दल बोलायचं झालं तर माझं ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र. मूळात मी तिकडे जाणार आहे, हे पक्षात कोणालाच माहीत नव्हतं, असेही विनोद तावडे म्हणाले.
हेही वाचा –Sanjay Raut : तावडेंबद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यानेच ठाकुरांना टीप दिली; राऊतांचा रोख कोणाकडे?