Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Election 2024 : जीवघेणा हल्ला, कार्यकर्त्यांमध्ये राडा, तर कुठे मतदान केंद्रांची...

Maharashtra Election 2024 : जीवघेणा हल्ला, कार्यकर्त्यांमध्ये राडा, तर कुठे मतदान केंद्रांची तोडफोड

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण 288 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पाडलं, मात्र काही ठिकाणी गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये राडा, ईव्हीएम मशिनची मोडतोड, तर एका ठिकाणी जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण 288 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पाडलं, मात्र काही ठिकाणी गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये राडा, ईव्हीएम मशिनची मोडतोड, तर एका ठिकाणी जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (What happened across the maharashtra on the polling day of the assembly elections)

हेही वाचा – Maharashtra Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? ‘चाणक्य’चा मोठा एक्झिट पोल समोर

  1. आज सकाळी 7 वाजल्यापासून राज्यभरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. यानंतर संध्याकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदानाच्या काळात दुपारी साडेबाराच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील मिळून चार मतदान केंद्रांवर तोडफोड झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्र प्रमुखाला बेदम मारहाण करत मतदानाचं साहित्य सर्वत्र अस्ताव्यस्त फेकण्यात आलं होतं.
  2. मुंबईच्या मालाड पूर्वकडील पठाणवाडीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांनी ठाकरे गटाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, ठाकरे गटाचे मुस्लीम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने त्यांच्या पक्षाला मत देण्यासाठी घेऊन जात होते. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
  3. मिरा-भाईंदरमध्ये भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले. भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच नरेंद्र मेहता स्वतः घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी वातवरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  4. ऐरोली विधानसभेतील कोपरखैरणे सेक्टर पाचमध्ये पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजपा आणि स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपआपसांत भिडले. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोपरखैरणे विभागातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केली. शंकर मोरेंच्या मुलाला त्यांनी त्याच्या कार्यालयात शिरून मारहाण केली. या मारहाणीत शंकर मोरे यांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर आता अंकुश कदमांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  5. बीड जिल्ह्यातीलच आष्टी मतदार संघातील बेदरवाडी गावात सुरेश धस आणि मेहबुब शेख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी दोनच पोलीस तैनात असल्यामुळे ते कार्यकर्त्यांचा गोंधळ करण्यापासून थांबवू शकले नाहीत. याप्रकरणी अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.
  6. वर्ध्यामध्ये शरद पवारांचे समर्थक असलेल्या नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, मी माझ्या गावात मतदान केल्यानंतर वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो होता. यावेळी उंबरी गावामधील बूथवर थांबवून मी लोकांची विचारपूस करत होतो. याचदरम्यान, मला बूथवर ग्रामपंचायतचे कर्मचारी लॅपटॉपवर दुसऱ्या उमेदवाराचं काम करत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मी त्यांची चौकशी करत होतो. तेवढ्यात उंबरीचे उपसरपंच सचिन खोसे हे माझ्या अंगावर धाऊन आले आणि त्यांनी मला थेट मारायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माझ्या पत्नीलाही शिवीगाळ करत मारहाण केली. माझी दीड वर्षांची मुलगी खाली पडता पडता राहिली. खरं तर उंबरीमध्ये गुंडागर्दी असून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नितेश कराळे यांनी केला.
  7. नाशिकच्या नांदगाव या ठिकाणी अपक्ष समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्यात बाचाबाची आणि नंतर प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. यावेळ सुहास कांदे यांनी तुझा आज मर्डर होणार, अशी थेट धमकीच समीर भुजबळ यांना दिली.
  8. इंदापूरमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली.
  9. कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराला गद्दर म्हटल्यानं शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राड सुरू केल्याचा आरोप केला.
  10. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज.) येथील भाजपाचे सरपंच शिवाजी रावते यांच्यावर तेथील विशिष्ट समुदायाच्या तरुणांनी मतदान केंद्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रावते गंभीर जखमी झाले. हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र राजकीय वैरातून हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -