मुंबई : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून दोन वेळचे आमदार सदा सरवणकर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मतदान केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. (Worli Assembly candidate Aditya Thackeray blunt criticism of Sharmila Thackeray)
मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते लढत आहेत. महिनाभर आम्ही प्रचारासाठी लोकांच्या घरोघरी जात होतो. त्यामुळे आम्हाला अनेक प्रश्न समजले असून ते आम्हाला सोडवायचे आहेत. याचवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, मनसेने सदा सरवणकर यांना अर्ज घेण्यास सांगितले होते का? यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, अमित ठाकरे यांच्याविरोधातल्या उमेदवारांना आम्ही अर्ज मागे घ्या, असेही म्हटलेले नाही. उलट ते शेवटच्या दिवशी भेटायला आले होते, पण आम्ही त्यांना भेटणं टाळलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : विनोद तावडेंना मिळालेली वागणूक…; राणेंकडून संताप व्यक्त
वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मागच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आरशासमोर उभे राहून वरळीत निवडणूक लढण्यात आली होती, तशी आम्ही निवडणूक लढवत नाही. मला अमित ठाकरेंचा अभिमान आहे की, ते स्वतः मैदानात उतरून या गोष्टी करत आहेत. त्यामुळे ते निवडून येतील याची 100 टक्के खात्री आहे. मला अमित ठाकरेंचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
अमित ठाकरेंसमोर सदा सरवणकरांचे आव्हान
दरम्यान, माहिम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंसमोर तीन वेळचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान आहे. सदा सरवणकर यांची या मतदारसंघावर पकड आहे. त्यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले होते. यानंतर त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. मात्र मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुद्धा झाले. पण ते शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम होते. असे असतानाही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबरला नाट्यमय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. सदा सरवणकर यांच्यानुसार त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायचं होतं. यासाठी त्यांचे पुत्र समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या घरीही गेले होते. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारली. यानंतर सदा सरवणकर हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – Raj Thackeray : वरळीत मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा? राज ठाकरेंनी सांगितले सत्य