संतापजनक! तू मोठी झाली आहेस का ? विचारत पित्याचा मुलीवर बलात्कार

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात जन्मदात्या बापानेच (४५) आपल्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी पित्यास वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पीडीत मुलगी आपल्या आई वडील , ७ वर्षांची बहीण आणि ३ वर्षाच्या भावासह पिंपरी चिंचवडमध्ये राहते. तिचे वडील काहीच काम करत नसून आई धुणी भांडी करते. त्यामुळे ती दिवसभर घऱात नसते. भावंडांमध्ये पीडिता मोठी असल्याने तिच्यावरच धाकट्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी पीडीतेला तिच्या वडिलांनी बेदम मारहाण केली. पण तिने ते आईला सांगितले नाही. मात्र शेजारच्यांनी पीडितेच्या आईस त्याबदद्ल सांगितले. यामुळे आईने तिला मारहाणीचे कारण विचारता भेदरलेल्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी वडिलांनी तू मोठी झाली आहेस का हे बघायचयं असं सांगून आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचं सांगितले. तसेच आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले. त्याचबरोबर आपण नकार दिल्याने त्याने आपल्याला मारहाण केल्याचे तिने आईला सांगितले. मुलीवर बापाकडून अत्याचार होत असल्याचे कळताच आईने बापाला जाब विचारला. याच मुद्दयावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आईने वाकड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी पित्यास अटक करण्यात आली आहे.