राज ठाकरे यांना पाचशे रुपयांचा दंड; अटक वॉरंट रद्द

परळीत दाखल होताच राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. राज यांच्यासाठी ५० फुटी हार, पुष्पवृष्टी असे नियोजन मनसे कार्यकर्त्यांनी केले होते. परळी न्यायालयातही मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. न्यायालयात राज ठाकरे यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे न्यायालय संतप्त झाले. न्यायालयात शांतता राखावी, असे न्यायालयाने कार्यकर्त्यांना बजावले.

परळीः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने पाचशे रुपयांचा दंड ठोठवला आहे. समन्स देऊनही न्यायालयात गैरहजर राहिल्याने राज ठाकरे याना हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

राज ठाकरे यांना २००८ मध्ये अटक झाली होती. त्याचे पडसाद परळीत पण उमटले होते. येथील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तोडफोड केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे आरोपपत्रही दाखल करण्यात आले.

पुढील सुनावणीसाठी राज ठाकरे हे हजर राहिले नाहीत. ३ व १२ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स राज ठाकरे यांना बजावण्यात आले होते. मात्र त्या दिवशी ते न्यायालयात हजर झाले नाहीत. राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने हजर राहू शकलो नाही, अशी सबब राज ठाकरे यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर त्यांना १८ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स राज यांना बजावण्यात आले. त्यानुसार राज ठाकरे हे बुधवारी परळी न्यायालयात हजर झाले.

परळीत दाखल होताच राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. राज यांच्यासाठी ५० फुटी हार, पुष्पवृष्टी असे नियोजन मनसे कार्यकर्त्यांनी केले होते. परळी न्यायालयातही मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. न्यायालयात राज ठाकरे यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे न्यायालय संतप्त झाले. न्यायालयात शांतता राखावी, असे न्यायालयाने कार्यकर्त्यांना बजावले.

त्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरु झाले. कोरोनामुळे न्यायालयात हजर राहू शकलो नाही, असे कारण राज ठाकरे यांनी न्यायालयाला दिले. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केले. त्यांना पाचशे रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

भडकाऊ व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राज्यभरात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास न्यायालयाकडून राज यांना समन्स बजावले जाते.