करोनामुळे पुण्यात २०२ उद्याने बंद, दादर मार्केटमध्येही शुकशुकाट

मुंबईत ५ करोनाग्रस्त तर पुण्यातून १५ करोनाग्रस्त रूग्ण समोर आले आहेत.

२०२ Parks Closed In Pune And Reduce crowd in Dadar Flower Market
करोनामुळे पुण्यात २०२ उद्याने बंद, दादर मार्केटमध्येही शुकशुकाट

देशभरात करोनाचे रूग्ण आढळल्याने सामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला जागतिक महामारी रोग म्हणून घोषित केले आहे. देशभरात करोनाचे वाढते प्रमाण पहाता सरकारकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुणे शहरात करोनाचे सर्वाधिक रूग्ण समोर आले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्यातील तब्बल २०२ उद्याने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. पुण्याप्रमाणे मुंबईतही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दादरच्या फुलमार्केट मध्येही काही प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाला. दादर मार्केटमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने लोक येत असतात मात्र आज परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळाली. याचा मोठा फटका तिथल्या विक्रेत्यांना बसला आहे.

पुण्याच्या सारस बागेत सकाळच्या वेळेस लोक मॉर्निंग वॉकला जात असतात. पुण्यात एकूण २०२ उद्याने आहेत. ही उद्याने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याच्या निर्णयावर सामान्य लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून भीतीपोटी पुणेकर घराबाहेर पडणं टाळतं होते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्या कमी झाली होती.

त्याचबरोबर मुंबई, पुण्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहेत. सारस बागेतील गणपती मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईत ५ करोनाग्रस्त तर पुण्यातून १५ करोनाग्रस्त रूग्ण समोर आले आहेत.

हे ही वाचा – Corona Virus : मुंबईत जमावबंदी लागू