घरताज्या घडामोडीभाजप मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील, संजय राऊतांचे रोखठोक वक्तव्य

भाजप मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील, संजय राऊतांचे रोखठोक वक्तव्य

Subscribe

आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम

भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील, त्यांचे वागणे आणि बोलणे तसच दिसत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही. असे रोखठोख वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय आणि भाजपच्या भूमिकेवरुन हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिल्यानंतर भाजपने केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी रोखठोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. आता ती फुटलेली दिसत आहे. परप्रांतीय विषय फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यापुरता नाही तर राष्ट्रव्यापी बनला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी उत्तर प्रदेशाचा आहे. ठाण्यात पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली, त्यावर भाजपने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले असल्याचे संजय राऊत यानी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

परप्रांतीय कोण?

“परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत.

शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱयाच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढ्यान् पिढ्या मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे? मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही.” अशी भूमिकाही संजय राऊत यांनी मांडली आहे.

- Advertisement -

युपीच्या निवडणुकांमुळे परप्रांतीयांचा मुद्दा

“मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले हे समजून न घेता त्यांचे उधळणे सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्य़ांसमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार आहे. देश सगळय़ांचाच आहे, पण कायदा-सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, असे भारतीय घटना सांगते. आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भाजपचे अध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे- ”परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?” मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसत असल्याचे संजय राऊत यांनी रोखठोखमध्ये म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -