घरमहाराष्ट्रशतका पलीकडे बघणारा लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज

शतका पलीकडे बघणारा लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज

Subscribe

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 100 वी स्मृतीदिन आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाची स्थापना राज्यासह देशात केली. कृषी, जल नीती, मोफत शिक्षण, व्यावसाय, अनिष्ट चालीरीतीप्रथांना पायबंद, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात त्यांनी दूरगामी काम केले. जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल.

शिक्षण क्षेत्रात काम

- Advertisement -

बहूजन समाज शिकल्या शिवाय समाजाचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून महाराजांनी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यांनी प्राथमीक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून प्रत्येक गावात प्राथमिक शाळा सुरू केल्या. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभारढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. नाशिक, पुणे, नगर, नागपूर सहअन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली.

आरक्षण कायदा

- Advertisement -

राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा काढला. कोल्हापूर संस्थानातील शासकीय नोकऱ्यामध्ये मागासलेल्या वर्गासाठी ५०% राखीव नोकऱ्या ठेवण्यात आल्या. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले.

विविध कायदे

अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. १९१८ साली स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

उद्योग व शेती सुधारणा

सामाजिक सुधारणांबरोबर शाहू महाराजांनी शेतीस व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. संस्थानात चहा, कॉफी, रबर लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहू महाराजांनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणारा उपक्रम ठरले. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌सुफलाम्‌ करून टाकले.

कला क्षेत्रातील कामगिरी

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायकगायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. या त्यांच्या कार्यामुळे ते शतका पलीकडे बघनारे लोकराजा ठरले. त्यांच्या कार्याला आणि दूरदृष्टीला माय महानगरचे विनंम्र अभिवादन

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -