Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर गणेशोत्सव २०१९ बाप्पाने रेल्वेला दिली सुबुद्धी! एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट शुल्क काढले

बाप्पाने रेल्वेला दिली सुबुद्धी! एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट शुल्क काढले

Subscribe

०११०७ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा चाकरमान्यांकडून सुपरफास्ट शुल्क आकारत असल्याची माहिती समोर आली आहे

गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी रेल्वे गाड्या उशिरा सोडल्यामुळे रेल्वे गाड्यांचा पूर्णत: फज्जा उडाला. आता तर सोडण्यात आलेल्या चार गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये ०११०७ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा चाकरमान्यांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच तात्काळ मध्य रेल्वेने या गाडीवरचा सुपरफास्ट शुल्क काढला आहे.

रेल्वे तिकिटांवर चुकीचा सुपरफास्ट शुल्क

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या चाकरमान्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अनेकांच्या नोकर्‍या कोरोनाकाळात गेल्या असून अशा परिस्थितीत मानाचा गणपती गावी बसविण्यासाठी चाकरमान्यांनी एसटी आणि रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. मात्र, एसटी आणि गाड्या सोडण्यात सरकारने उशिर केला. परिणामी कर्जबाजारी होऊन चाकरमानी खासगी वाहनांच्या माध्यमातून गावाकडे गेले आहेत. त्यानंतर आता कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान १९४ विशेष गाड्यांची घोषणा केली. त्यानुसार १५ ऑगस्टपासून दररोज चार रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र, यात सुद्धा चाकरमान्यांचा रेल्वे तिकिटांवर चुकीचा सुपरफास्ट शुल्क आकारून आर्थिक पिळवूणक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोकणात जाणार्‍या चार गाड्यांपैकी, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी या गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा रेल्वेकडून प्रवाशांच्या तिकिटांवर सुपरफास्ट शुल्क लावून चाकरमान्यांची लूट सुरू होती. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. परंतु, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी या गाडीचा सरासरी वेग फक्त ४४ किमी प्रतितास आहे. ही गोष्ट लक्षात येताच मध्य रेल्वेने तत्काळ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेसच्या रेल्वे तिकिटांवरील सुपरफास्ट शुल्क काढण्यात आले आहे.

- Advertisement -

 इतके शुल्क आकारण्यात येते

रेल्वे नियमानुसार ज्या रेल्वे गाडीचा वेग ५५ किमी प्रतितास इतका असतो. त्या रेल्वे गाडीच्या प्रति प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येते. एक्झिक्युटिव्ह एसी-१ कोच ७५ रुपये, एससी-२ कोच ४५ रुपये, एसी-३ ४५ रुपये, प्रथम श्रेणी ४५ रुपये, स्लिपर कोच ३० रुपये आणि व्दितीय श्रेणी १५ रुपये असा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येतो.

 प्रवाशांचे शुल्क परत करणार का ?

- Advertisement -

एलटीटी-रत्नागिरी या रेल्वे गाडीने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांकडून रेल्वे तिकिटांवर सुपरफास्ट शुल्क आकारण्यात आले होते. मात्र, ही बाब लक्षात येताच मध्य रेल्वेकडून सुपरफास्ट शुल्क आता काढण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी सुपरफास्ट शुल्क देऊन या गाडीचे आरक्षण केले होते, त्यांचे पैसे आता परत मिळणार का? हा प्रश्न पडला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -