विकासकांकडून दीड कोटींची फसवणूक

रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

कल्याण । ठाकुर्लीतील एका विकासकाने पाच वर्षापूर्वी घर खरेदीदारांना कमी किमतीत सदनिका विकत देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण एक कोटी 55 लाख 56 हजार रुपये उकळले. त्यानंतरच्या काळात सदनिका नाहीच पण भरणा केलेले पैसेही परत न मिळाल्याने पाच घर खरेदीदारांनी विकासकाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

हनुमान प्रोप्रायटर विश्वम प्रॉपर्टीचे आणि डिझाईन्सचे मालक मेहुल जेठवा, कल्पेश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची नावे आहेत. ऑगस्ट 2018 ते तक्रार दाखल करेपर्यंतच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. ठाकुर्लीतील 90 फुटी रस्त्यावर चामुंडा गार्डन भागात राहणारे नोकरदार निखिल राजेंद्र देशमुख यांनी ही तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, विकासक जेठवा, पटेल यांनी ठाकुर्ली पूर्व भागातील श्री कृष्ण प्लाझा इमारती मधील बी पाख्यातील 705 क्रमांकाची सदनिका आपण तुम्हाला कमी किमतीत विकत देतो असे निखिल यांना सांगितले. या सदनिका खरेदीच्या बदल्यात विकासकांनी निखिल यांच्याकडून 24 लाख 66 हजार रुपये वसूल केले. निखिल यांनी खरेदी व्यवहार करण्यासाठी विकासकांच्या मागे तगादा लावला. विविध कारणे देऊन विकासक टाळाटाळ करू लागले.