कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे १.२५ लाख कार्यकर्ते लागले कामाला

bjp
भाजप

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, सर्वच पक्षाकडून आणि सामाजिक संस्थाकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रकारची मदत करण्यासाठी भाजपचे संपूर्ण राज्यात सुमारे १.२५ लाख कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात असून, ही संख्या आणखी वाढविण्याच्या सूचना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मागील तीन दिवस विविध पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंडळ आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण ५ संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू झालेल्या विविध सेवाकार्याचा आढावा घेतला आणि विविध सूचना केल्या.

भाजपचे कार्यकर्ते अशी करतात मदत 

भाजपचे राज्यभर सुमारे ४५० मंडळांमध्ये काम सुरू झाले असून, ३०० ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू झाली आहेत. तर १० जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे. एवढेच नाहीतर १००० खेड्यांमध्ये सॅनिटायझेशनचे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते सुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मदत करताना सोशल डिस्टन्सिंग पाळा

दरम्यान सद्या देशभरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने मदत करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, हेही कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच घरी राहायचे असले तरी ही सुट्टी नाही. त्यामुळे आपली स्वत:ची काळजी घेतानाच अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – पंढरीची चैत्र वारी रद्द, १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद