घरमहाराष्ट्रमुंबईतील 1 लाख फेरीवाल्यांना महिन्याभरात मिळणार कर्ज, भागवत कराडांनी दिली माहिती

मुंबईतील 1 लाख फेरीवाल्यांना महिन्याभरात मिळणार कर्ज, भागवत कराडांनी दिली माहिती

Subscribe

मुंबई : मुंबईतील रस्त्यावरच्या एक लाख फेरीवाल्यांसह कोकण प्रांतातील दीड लाख पात्र लाभार्थ्यांना महिन्याभरात, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरित केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

डॉ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईत, राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झाली, त्यात, पीएम स्वनिधी म्हणजेच रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर निधी आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर लगेचच, दुसऱ्या बैठकीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, महाराष्ट्रातील पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला महापालिका आयुक्त आणि महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याl दोन्ही योजनांच्या सात जिल्ह्यांत सुरू असलेल्या अंमलबजावणीच्या आढाव्यावर भर देण्यात आला.

- Advertisement -

या बैठकांनंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. वित्तीय सेवा विभागाने मुंबई प्रदेशात, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 2 लाख कर्जे वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, आतापर्यंत केवळ, 24,843 लोकांचीच या योजनेअंतर्गत नोंदणी होऊ शकली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. गुजरातने 3.5 लाख पीएम स्वनिधी कर्जे वितरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले, अशी माहिती कराड यांनी दिली.

ही प्रादेशिक पातळीवरील बँकर्सची पहिली आढावा बैठक झाली. आम्ही यापुढे या योजनांच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेऊ, त्यासाठी बँकर्स समितीच्या जिल्हा व्यवस्थापकांची आणि कोकण प्रांतातील महापालिका आयुक्तांची मदत घेतली जाईल. विशेषतः कोकण भागात पीएम स्वनिधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या यशस्वीतेसाठी आम्ही विशेष प्रयत्न करू, पश्चिम महाराष्ट्रातील कोकण विभागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहोत, असे कराड यांनी सांगितले.

- Advertisement -

एका बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार रमेश पाटील, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हेही उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक विजयकुमार ए. आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय बँकर्स समितीचे प्रमुख विजय कांबळे आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -