दरवाजाच्या लॉकमध्ये बिघाड; अडकलेल्या दहा वर्षीय बालकाची सुटका

या बालकाला ठाणे महापालिकेच्या बाळकूम अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत खरूप बाहेर काढले.

ठाण्यातील कासारवडवली येथे चौथ्या मजल्यावरील बेडरूममध्ये दहा वर्षीय मुलगा अडकला होता. मात्र या बालकाला ठाणे महापालिकेच्या बाळकूम अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत खरूप बाहेर काढले. आज सोमवारी सकाळीच साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.  (10 years old boy stuck in bedroom in thane)

हेही वाचा – झाडाने रोखून धरली मुंब्र्याची वाट; तीन तास वाहतुक ठप्प

घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पुराणिक होम, इमारत क्रमांक जी/३ च्या चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक-४०३ मध्ये दहा वर्षीय मुलगा अडकल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी बाळकूम अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, खोलीच्या दरवाजाचे लॅच लॉक डोअर ब्रेकरच्या सहाय्याने तोडले आणि अडकलेल्या कवीश पाल या दहा वर्षीय बालकाची काही मिनिटांत सुखरूप सुटका केली. तसेच या घटनेत शैलेश पाल यांच्या खोलीतील बेडरुमच्या दरवाजाचे लॅच लॉकमध्ये बिघाड होऊन दरवाजा लॉक झाल्याने बालक अडकला होता, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

हेही वाचा – अंबरनाथ तालुक्यात पावसाळी पर्यटनावर निर्बंध

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील ओवळा येथे अकराव्या मजल्यावरील बेडरुममध्ये दोन वर्षीय चिमुकली अडकली होती. तिलाही अग्निशमन दलाच्या जवांनानी सुखरुप बाहेर काढले होते.