महाराष्ट्रातील १०० गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत, ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन

मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू असतानाच राज्यातील अनेक गावे इतर राज्यात सामील होण्यास इच्छुक असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागरी विकास, सोयी सुविधांच्या अभावामुळे नाराज ग्रामस्थांनी दुसऱ्या राज्यात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील जवळपास १०० गावे दुसऱ्या राज्यात विलीन व्हावीत म्हणून ग्रामस्थांकडून शासनाला रितसर निवदेन करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सोलापुरातील पाणी प्रश्न पेटल्याने तेथील नागरिक कर्नाटकात सामील होण्यास राजी असल्याचा दावा कर्नाटकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. तेव्हापासून राज्यात बराच वादंग सुरू आहे. त्यातच, याप्रश्नी चर्चा करण्यापेक्षा दोन्ही राज्यातील नेते एकमेकांवर आगपाखड करत असल्याने समस्या आणखी बिकट बनत चालली आहे. दरम्यान, राज्यातील आणखी १०० गावे आजूबाजूच्या सीमांलगत असलेल्या राज्यात इच्छूक असल्याचं समोर आलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोर्सेगाव, केगाव खु., म्हैसलगी, खानापूर, गुड्डेवाडी, शेगाव, तडवळ, आळगी, अंकलगी, धारसंग, कल्लकर्जाळ, मुंढेवाडी, केगाव बु., सुलेरजवळगा, मंगरुळ, देवीकवठा, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., कुडल, शावळ, हिळ्ळी, उडगी, खैराट ही गावे. तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरुर, चिंचपूर, लवंगी यांच्यासह महाराजागुडा येथील जवळपास 16 ग्रामस्थ आणि परमडोली तांडातील काही गावकऱ्यांनी तेलंगाणामध्ये जाण्याची आग्रही मागणी केली आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमाभागातील गोमाल 1- 2, चाळीसटापरी, भिंगाराया गावातील नागरिकांनी मध्य प्रदेशसोबत विलीन करण्याची मागणी केली आहे. तर, यामध्ये सातपुड्यातील चार गावांचाही समावेश आहे.

नांदेड, चंद्रपुरातील अनेक गावांना महाराष्ट्रातून बाहेर जायचं आहे. यामध्ये देगलूर तालुक्यातील 13 , बिलोली तालुक्यातील 15 गावं, धर्माबाद तालुक्यातील 19 तर, किनवट तालुक्यातील 17 गावांना राज्याबाहेर जाण्याचे वेध लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील काही गावांना गुजरातमध्ये विलिन करण्याची मागणी करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने या गावांना गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेलेले असताना आता महाराष्ट्रातील गावेही गुजरातला जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.