राज्यातील १० हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन, बेमुदत संपाचा इशारा

Community Medical Officer Strike | राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आरोग्य अधिकारी निदर्शने करणार आहेत.

Community Medical Officer Strike | मुंबई – मार्ड डॉक्टरांचा संप मिटत नाही तोवर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Community Medical Officer) कामबंद आंदोलन पुकारले आहे. प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं कारण देत हे आंदोलन पुकारण्यात आले असून मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – हजारो पदे भरणार, कोरोना भत्ता देणार; महाजनांच्या आश्वासनानंतर ‘मार्ड’चा संप मागे

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागागआंतर्गत आरोग्य उपकेंद्रात समूदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असतात. त्यांना शासकीय सेवेत कायम करून ब वर्गाचा दर्जा देणे, वेतन निश्चिती ३६ हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन ४० हजार रुपये करावे, बदल्यांबाबत धोरण निश्चित करावं, आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे या समूदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. राज्यभरात जवळपास १० हजारांहून अधिक समूदाय वैद्यकीय अधिकारी असून या सर्वांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे त्यांच्या कामबंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तसेच, राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आरोग्य अधिकारी निदर्शने करणार आहेत.