१०६७६ झेडपी शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे आदेश प्राप्त होताच जिल्ह्यातील 10 हजार 676 शिक्षकांनी ऑनलाईन माहिती अपलोड केली. शिक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नाशिकचा राज्यात प्रथम क्रमांक आला. परंतु, सत्तांतर झाल्यामुळे या शिक्षकांना आता बदली होणार की नाही, याची चिंता वाटू लागली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे बदली झालेली नाही. चालू वर्षी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने आदेश दिले. साधारणत: 10 हजार 900 शिक्षक या बदली प्रक्रियेत सहभागी झाले. परंतु, गेल्या महिन्यांत बहुतांश शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील निषकांच्या आधारे जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती 20 जून 2022पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर सादर करण्यात आली. शिक्षकांची माहिती गट शिक्षणाधिकार्‍यांनी मान्य केल्यानंतर 22 जून रोजी ही माहिती अंतिम करण्यात आली.जिल्ह्यात 3 हजार 261 शाळांमध्ये साधारणत: 11 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टिम (टीटीएमएस) अर्थात शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीवर लॉगइन करुन माहिती प्रमाणित करावी लागली.

शिक्षकांच्या मोबाईलवर हा लॉगइन आयडी आणि ओटीपी यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी 668 शाळा या अवघड क्षेत्रात आहेत. बदली प्रक्रियेची माहिती अपलोड करण्यात नाशिक जिह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला. बदली प्रक्रिया सुरु होण्याच्या टप्प्यावर असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि शिक्षण विभागाची ही प्रक्रिया थंडावली. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला बदल्यांच्या आदेशाची प्रतीक्षा लागून आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन पुढील कार्यवाही होण्यासाठी साधारणत: दोन महिने जातील, असे दिसते. त्यामुळे यंदा बदल्या होतील की नाही, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.