घरमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Subscribe

बारावीची परीक्षा मे महिन्यात तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थी अनेक दिवसांपासून चिंतेत होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दहावीची परीक्षा जून आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यादृष्टीने सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार येईल, तसेच राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वीकारावा असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले. राज्यामध्ये दहावीच्या परीक्षेला सुमारे 17 लाख तर बारावीच्या परीक्षेला 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शिक्षण विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जर्‍हाड, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बरीच चर्चा करण्यात आली. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.

प्रवेश प्रक्रियेवर होणार परिणाम
बारावीच्या परीक्षा मे महिन्यात तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम पुढील प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या कोरोनामुळे निकाल उशिरा लागल्याने बहुतांश प्रवेश प्रक्रिया मार्च 2021 पर्यंत सुरू होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आताही परीक्षा पुढे ढकलल्यास त्याचा परिणाम अकरावी, सीईटी तसेज जेईई, नीटच्या प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार परीक्षा घोषीत करताना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा लक्षात घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

- Advertisement -

तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा
ज्या तारखांना बारावीच्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. परीक्षांच्या आयोजनासाठी लागणार्‍या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणार्‍या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचार्‍यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

पावसाळ्यात परीक्षा घेताना मंडळाची तारेवरची कसरत
राज्यामध्ये पावसाच्या हंगामाला जूनमध्ये सुरुवात होते. कोकण, नागपूर यासारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद पडतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक बनवताना राज्य मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -