घरताज्या घडामोडीदहावीच्या निकालाची कार्यपद्धती जाहीर! नववीतील ५० टक्के गुण, तर दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील ३०...

दहावीच्या निकालाची कार्यपद्धती जाहीर! नववीतील ५० टक्के गुण, तर दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील ३० टक्क्यांवर निकाल

Subscribe

दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील असे सूतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. निकाल कशापद्धतीने जाहीर करण्यात येणार याबाबत विद्यार्थी व पालकांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता नववीतील १०० पैकी ५० गुण, तर दहावीतील ८० पैकी ३० गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील असे सूतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर इयत्ता नववीत झालेल्या दोन घटक चाचणी आणि एक सत्र परीक्षा पूर्ण झाली होती. यानंतर ऑनलाइन वर्गात इयत्ता दहावीच्या विविध सराव परीक्षा पार पडल्या या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेले गुण एका सूत्रात बांधून विद्यार्थ्यांना अंतिम गुणदान होणार आहे. याची कार्यप्रणाली बुधवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासाठी ऑप्टिकल मार्क्स रीडिंग ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यानुसार नववीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय १०० पैकी मिळालेल्या गुणांचे शाळा स्तरावर ५० टक्के गुणांत रुपांतर करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला १०० पैकी ७७ गुण मिळाल्यास त्याचे ५० टक्क्यांमध्ये रुपांतर करताना ३८.५ इतके गुण येतात. मात्र, ते गुण ३९ इतके ग्राह्य धरण्याचे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत.

दहावीमध्ये प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा यातील एक किंवा दोन्ही परीक्षा घेतलेली असल्यास शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे गुणांची नोंद करण्यात यावी व त्याचे ३० पैकी गुणात रुपांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे शाळेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या विविध परीक्षांमधील एखाद्या विद्यार्थ्यांने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषयनिहाय ८० गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास दोन परीक्षांपैकी सर्वात्तम गुण असलेल्या एका परीक्षेचे विषयनिहाय मिळालेले गुण विचारात घेऊन त्यात ८० गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करण्यात येतील. त्याचप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीमध्ये माध्यमिक शाळेत प्रथम सत्र व सराव परीक्षा या दोन्ही घेणे शक्य झाले नाही अशा शाळांनी वर्षभरात इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित केलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक कार्याला विद्यार्थ्याला विषयनिहाय प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर करण्यात येणार आहेत. नववी व दहावीचे अपूर्णांकात आलेले गुण हे पुढील पूर्ण गुणात रुपांतरित करण्यात येणार आहेत.

शाळांकडून ऑप्टिकल मार्क्स रीडिंग शीट भरून पाठवल्या जाणार आहेत. या शीटद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण राज्य माध्यमिक मंडळाकडे जाणार असून, त्याद्वारे निकालाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशिष्ठ वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. हा निकाल पारदर्शक पद्धतीने जाहीर व्हावा या उद्देशाने शाळांना निकाल समिती स्थापन करावी लागणार आहे. या वेळापत्रकानुसार ११ ते २० जून या कालावधीत शिक्षक विषयनिहाय गुणतक्ते भरून शाळांचे निकाल समितीकडे सादर करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -