कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी वितरित

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १२९ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, आता कोरोनाशी लढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १२९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हा निधी कोकण व औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या मार्फत तात्काळ संबंधित जिल्हांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागाने सोमवारी  जारी केला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारी समितीची दुसरी बैठक जून महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोकण व औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १२९ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून राज्यातील कोरोना बाधितांसाठी विलगीकरण कक्ष, तात्पुरती निवास व्यवस्था, जेवण, कपडे, नमुने गोळा करणे, तपासणी-छाननी, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळेचा खर्च, व्हेंटीलेटर, हवा शुध्दीकरण खर्च, थर्मल स्कँनरवरचा खर्च भागवण्यात येणार आहे.

या जिल्ह्यांना मिळाला निधी

ठाणे ५ कोटी, पालघर ४ कोटी, रायगड ५ कोटी, मुंबई महापालिका ६० कोटी, मीरा भाईंदर महापालिका १० कोटी, वसई विरार महापालिका ५ कोटी, कल्याण डोंबिवली महापालिका १० कोटी, नवी मुंबई महापालिका १० कोटी, संभाजीनगर ५ कोटी ५० लाख, जालना २ कोटी, परभणी २ कोटी, हिंगोली २ कोटी, नांदेड २ कोटी, बीड २ कोटी, लातूर ४ कोटी, धाराशीव ५० लाख रुपये.