घरमहाराष्ट्रराज्यातही बारावी परीक्षा रद्द!

राज्यातही बारावी परीक्षा रद्द!

Subscribe

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

केंद्र सरकारने सीबीएसई मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य मंडळाकडूनही बारावीची परीक्षा रद्द करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती आणि व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

करोनाच्या परिस्थितीमध्ये १२वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. ती आम्ही मे अखेरपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर देखील करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत ती पुन्हा पुढे ढकलली. केंद्राने मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सुसूत्रता असायला हवी, असे म्हटले होते. या सर्व बाबींविषयी मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल, असे देखील शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

सर्व निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -