विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी १३ अर्ज  दाखल, भाजपकडून सदाभाऊ खोत यांचा अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसने दोनऐवजी तीन उमेदवारी अर्ज भरले असले तरी शिवाजी गर्जे यांचा अर्ज अतिरीक्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र भाजप कोणाचा अर्ज मागे घेणार याबाबत उत्सुकता आहे.

विधानपरिषद निवडणुकीत (maharashtra legislative council election) उमेदवारी अर्ज (Candidature application) भरण्याच्या गुरुवारच्या अखेरच्या दिवशी  १० जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजपचे (BJP) संख्याबळ पहाता चार उमेदवार निवडून जाऊ शकतात. मात्र अखेरच्या दिवशी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने भाजप उमेदवारांची संख्या सहा झाली आहे.

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती. मात्र नाट्यमय घटना घडत गेल्याने अखेरच्या दिवशी अतिरीक्त अर्ज भरले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) शिवाजी गर्जे (shivaji garje) यांचा अतिरिक्त अर्ज दाखल केला आहे. तर भाजपच्या पाच उमेदवारानंतर सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाजप पुरस्कृत अर्ज भरला आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांना सहावे उमेदवार म्हणून  घोषित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दोनऐवजी तीन उमेदवारी अर्ज भरले असले तरी शिवाजी गर्जे यांचा अर्ज अतिरीक्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र भाजप कोणाचा अर्ज मागे घेणार याबाबत उत्सुकता आहे. सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना :  सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजी गर्जे

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

भाजप  :  प्रवीण दरेकर, राम शिंदे,  श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत