सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या साथीदारांकडून १३ पिस्तुले जप्त

13 pistols seized from accomplices of accused Santosh Jadhav in Sidhu Musewala case

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव यांच्या टोळीतील 7 जणांना व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून देशी बनावटीची 13 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. जाधवच्या टोळीतील दोन साथीदारांनी मध्यप्रदेशातील मनवर येथून पिस्तुले आणल्याचे तपासात समोर आले आहे.

या आरोपींना करण्यात आले अटक –

या प्रकरणी जाधवचे साथीदार जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय 23, रा. मंचर) श्रीराम रमेश थोरात ( वय 32), जयेश रतीलाल बहिराम (वय 24, रा. घोडेगाव), जिशान इलाइबक्श मुंढे (वय २०), वैभव उर्फ भोला शांताराम तिटकारे (वय 19, रा.जळकेवाडी, चिखली) रोहित विठ्ठल तिटकारे (वय 24, रा सरेवाडी, नायफड) सचिन बबन तिटकारे (वय 22, रा. धाबेवाडी, नायफड) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दखल करण्यात आला असून एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

खंडणी प्रकरणात नारायणगावमधील एक व्यावसायिकाने फिर्याद दिल्याची माहिती पुणे ग्रामीन पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. जाधवने पाच ते सहा महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला समाजमाध्यमातील दूरध्वनी सेवेचा वापर करुन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. घाबरलेल्या व्यावसायिकाने तक्रार दिली नव्हती. त्यानंतर जाधवने पुन्हा व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. जाधवने साथीदाराला व्यावसायिकाकडे पाठविले होते. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुसेवाला हत्या प्रकरणात जाधवला अटक करण्यात आल्याचे समजल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिस्तुले खरेदी –

मुसेवालाच्या हत्येनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोपी जयेश बहिराम आणि साथीदारांनी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणली. जाधवचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी थेट संबंध असून खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जाधव टोळीतील सात जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याने पिस्तुले कशासाठी आणली, त्यांचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का ? यादृष्टीने तपास सुरू आहे.