कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी आदिल दुराणीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राखी सावंत ही जोगेश्‍वरीतील समर कॅफेजवळील सेरेनिटी अपार्टमेंटमध्ये राहते. जानेवारी २०२२ तिची आदिल दुराणीशी ओळख झाली होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते

adil durani
adil durani

मुंबई – सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारी ड्रामा क्वीन राखी सावंत हिचा पती आदिल खान दुराणी याला कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत अंधेरीतील लोकल कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्याची लवकरच सुनावणी होणार आहे. आदिलने यापूर्वी दोन वेळा आपल्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा आरोप राखी सावंतने तक्रार अर्जात केला असून, आदिलविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन वेळा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

राखी सावंत ही जोगेश्‍वरीतील समर कॅफेजवळील सेरेनिटी अपार्टमेंटमध्ये राहते. जानेवारी २०२२ तिची आदिल दुराणीशी ओळख झाली होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते. २९ मे रोजी या दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर जुलै महिन्यांत त्यांनी कोर्टात लग्नाची नोंदणी केली होती. लग्नाविषयी सोशल मीडियावर कुठलेही वक्तव्य करू नये, असे आदिलने राखीला आधीच बजावून सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांत त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागला होता. २२ ऑगस्टला झालेल्या भांडणानंतर आदिलने राखीला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर तिने आदिलविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. नंतर त्याने तिची मनधरणी केली होती. त्यानंतर त्यांच्या समेट झाला होता. त्यानंतर तो तिला नमाज नही पडेगी तो तुझे तलाक दे दूंगा, तेरे मुंहू पर ऍसिड फेंक दूंगा, बॉलिवूडमध्ये काम करने के लायक नही छोडूंगा अशी धमकी देऊ लागला होता.

जानेवारी २०२३ राखीला आदिलचे निवेदिता चंडाल या तरुणीसोबत अफेअर असल्याची माहिती समजली होती. याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद होऊ लागले होते. त्यातून तो तिला मारहाण करत होता. त्यामुळे तिने पुन्हा आदिलविरुद्ध ओशिवरा पोलिसांत दुसरी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. याच दरम्यान आदिलने त्यांच्या संयुक्त बँक खात्यातून १ कोटी ५३ लाख रुपये काढले होते. ५ फेब्रुवारीला तिच्या घरातून पाच लाख रुपयांची कॅश आणि सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने घेतले होते. कॅशसहीत दागिन्यांच्या अपहारावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यात दोन दिवसांपूर्वीच आदिलने तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राखीने त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर आदिलविरुद्ध पोलिसांनी ३७७, ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६ भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी आदिलचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यांनतर कोर्टाने आदिलला २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्याच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर तपास अधिकार्‍यांचे मत मागविण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने सायंकाळी आदिल दुराणीला पोलीस बंदोबस्तात कारागृहात पाठविण्यात आले होते.


हेही वाचाः ‘या’ खेळाडूला भारतीय संघातील स्थानाबाबत साशंकता, पण रणजी ट्रॉफीमध्ये शतकी खेळी