विधानसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ या ३४ दिवसांमध्ये तब्बल ३ हजार ५५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची यादी करून उपद्रवी ४८ गुन्हेगारांना तडीपार केले असून, दोघांची एमपीडीए कायद्यांतर्गत कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी अवैध कठोर कारवाई करत १४ गावठी पिस्तूल, ३७ जिवंत काडतुसे, ४३ तलवारी, ९ कोयते, चॉपर, चाकू असे घातक हत्यारे जप्त केली. (14 pistols, 37 live cartridges, 43 swords seized)
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक राहिल आहे. नाशिक शहर पोलीस यंत्रणेसोबत ग्रामीण पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांकडून सर्व अपर अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वर्गाकडून अवैध हालचालींवर वॉच ठेवला जात आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील गावपातळीवरील गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची विशेष मोहीम ग्रामीण पोलिसांनी राबविली. यामध्ये १ कोटी ४४ लाख ४० हजार ७५८ रुपयांच्या हजारो लिटर गावठी दारूचा साठा पोलिसांनी नष्ट केला. दारूबंदी कायद्यांतर्गत १,१९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सव्वादोन कोटींची रोकड जप्त
आदर्श आचारसंहिता कालावधीत ग्रामीण पोलिसांनी अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत अवैध रोख रक्कम वाहतूकविरोधी कारवाई करत सुमारे दोन कोटी २२ लाख ४७ हजार ८४० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एकूण सात कोटी ८२ लाख ३१ हजार ४३९ रुपयांचा मुद्देमाल या आचारसंहिता कालावधीत ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नागरिकांना आवाहन
पोलिसांच्या वाहनांवर ११० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे. आचारसंहितेचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.