पुणे हादरलं! १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

14 years old girl killed in pune Bibwewadi
पुणे हादरलं! १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

पुण्यात आज, मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्यावर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. माहितीनुसार याप्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नक्की काय घडले?

पुण्यातील १४ वर्षी ही मुलगी स्थानिक संघामध्ये कबड्डीपटू होती. आज, मंगळवारी ती कबड्डीचा सराव करण्यासाठी बिबवेवाडीतील यश लाँच येथे गेली होती. तिथे तीन जणांनी तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. ज्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. ही मुलगी आठवीत शिकणारी होती. याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजून तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणातील आरोपींची प्रथमदर्शनी ओळख पटलेली आहे. यामधील मुख्य आरोपीचे नाव ऋषीकेश भागवत असे आहे. आरोपी ऋषीकेश भागवत हा तिच्या नात्यातील असून तो मुलीचा चुलत मावस भाऊ लागतो, अशी माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.