राज्यात दोन दिवसांत १६ लाख लिटर्स दारूची विक्री, ६२ कोटींची कमाई

home delivery of liquor will be available in the state excise department decision
liquor

देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. दरम्यान राज्यातील काही भागात सोमवार पासून दारू विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला आहे. यानंतर राज्यातील दारूच्या दुकानांवर तळीरामांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दोन दिवसात राज्यात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांची दारू खरेदी केली आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात १६.१० लाख लीटर दारूची विक्री केल्याची माहिती राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

राज्यात लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात अधिकृत परवाना असलेल्या दुकानदारांना दारू विक्री करण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली. ३ मेपर्यंत राज्यात दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र सोमवारपासून राज्यात काही ठिकाणी दारूची दुकाने उघडण्या आधीच तळीरामांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी गर्दी नियंत्रणा बाहेर होत असल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला. तर काही शहरात आणि जिल्ह्यात स्थानिक आधिकाऱ्यांनी दारू विक्री करण्यास परवानगी दिली नसल्याचे पाहायला मिळाले.

तरीदेखील राज्यात एकूण १० हजार ८२२ परवाना असलेल्या दारूच्या दुकानांपैकी ३ हजार ५४३ दारूची दुकाने सोमवारपासून उघडण्यात आली. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यात दारू विक्री करण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दारू विक्री करण्यास नकार दिला.


हेही वाचा – Big Breaking: मुंबईत पुन्हा दारूबंदी, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बंद