मीरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात

Eknath

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ४० आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता मीरा-भाईंदरमधील १८ नगरसेवकही त्यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

हेही वाचा – राष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल, द्रौपदी मुर्मूंसाठी शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी हॉटेल लीला येथे आहेत. या हॉटेलमध्ये जाऊन मीरा-भाईंदरमधील १८ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच, थोड्यावेळात ते प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मीरा भाईंदर येथील १८ नगरसेवकांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज समर्थन आणि पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका पुढे नेण्याची आम्ही भूमिका घेतली. त्यामुळे या 18 नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “हे सर्व सामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पुढे नेणारे सरकार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका होती. त्यामुळे राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. राज्यातील पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक, नगरसेवक, संघटना, सर्वसामान्य माणसाला आमची भूमिका मान्य आहे, तसेच या सरकारला त्यांचा पाठिंबा आहे.”