घरमहाराष्ट्रमुंबईतील १८७ सुशोभीकरण कामांचा आज शुभारंभ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील १८७ सुशोभीकरण कामांचा आज शुभारंभ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Subscribe

राज्यात सत्तानंतर होऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सुशोभीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला

मुंबई : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. तसेच  मिशन मोडवर हे काम हाती घ्यावे, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी  येथे दिले. दरम्यान, आज, गुरुवारी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

राज्यात सत्तानंतर होऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सुशोभीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. जी २० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका ह्या मुंबईत होणार आहेत . हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडींग जोरदारपणे करावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

- Advertisement -

स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृष्यस्वरूपात बदल दिसावे यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी पाच हजार  स्वच्छतादूतांची नेमणूक करावी. महत्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी.  महत्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करून  मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

महानगरात ज्याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी सुरू आहे, त्या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी. शहरातील स्कायवॉकवर रोषणाई करावी. त्याचबरोबर स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असे  शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

तर  मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची निरंतर स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या  मुंबईत राबवाव्यात, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी  यावेळी दिले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अंमलात आणावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नुतनीकरण (रिसर्फेसिंग), पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेट, वॉलपेंटींग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -