Homeक्राइमNashik : मिक्सर ट्रकच्या धडकेत २ ठार; मदतीऐवजी नागरिकांकडून भाजीपाल्याची पळवापळवी

Nashik : मिक्सर ट्रकच्या धडकेत २ ठार; मदतीऐवजी नागरिकांकडून भाजीपाल्याची पळवापळवी

Subscribe

भरधाव मिक्सर ट्रकने दिलेल्या धडकेत रस्त्याच्या कडेला थांबलेले दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी (दि.२६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील वेरुळकर बंगल्याजवळ घडली. घटनास्थळावरून पळालेल्या मिक्सर ट्रकचालकास पोलिसांनी सोमवारी (दि.२७) अटक केली. याप्रसंगी नागरिकांकडून असंवेदनशीलतेचे दर्शन घडले. काही नागरिक छोट्या हत्तीमधून उतरवून ठेवलेला भाजीपाला उचलून नेत असल्याचे चित्र बघायला मिळाले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवर्धन गोसावी (रा. पुलेनगर, विजय चौक, पेठरोड) व पांडु लाखन (रा. वडुली, ता. कपराडा, जि वलसाड, गुजरात) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गंगाराम ओतार असे जखमीचे नाव आहे. संदिप रामदास सानप (रा. निफाड) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व विनायक ढवळू पवार (रा. राजबारी, पेठ) यांच्या फिर्यादीनुसार, पांडू लाखन यांनी पेठरोडवरील वेरुळकर बंगल्याजवळ रस्त्याच्या कडेला रविवारी (दि.२६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छोटा हत्ती (एमएच १५ इजी १८४७)मधून भाजीपाला खाली उतरवला. त्यानंतर लाखन यांनी चालक गोवर्धन गोसावी यांना भाड्याचे पैसे देत होते. त्यावेळी आरटीओ ऑफिसकडून तवली फाट्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव मिक्सर ट्रक(एमएच १५ एचएच ६२८४) ने छोट्या हत्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात गोवर्धन गोसावी व पांडु लाखन हे ठार झाले. तर गंगाराम ओतार गंभीर जखमी झाले. पुढील तपास उपनिरीक्षक बळवंत गावित करीत आहेत.