जागा २ लाख, भरती ७५ हजार जागांची, न्याय कसा मिळणार?; सत्यजित तांबेची पहिल्याच भाषणात चौफेर फटकेबाजी

संगमनेर : विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनीही सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणार्‍या समस्यांवर बोट ठेवले. चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये 75 हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल अभिभाषणात कुठेही उल्लेख नव्हता असे सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले. ’शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती होताना दिसत नाही. 2 लाखांपेक्षा जास्त रिक्त आहे. मात्र 75 हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे?

सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. यामुळे म.प्र सरकारने वयाची अट 3 वर्ष शिथील केली. राजस्थानने वयाची अट 4 वर्ष शिथील केली. आंध्र प्रदेशने वयाची अट 2 वर्ष शिथील केली. महाराष्ट्राने मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आ.सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.विधान परिषदेतील राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आपल्या पहिल्याच भाषणात सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेला मोठी ऐतिहासिक परंपरा असून या सधनात काम करण्याची संधी मिळाली हा सन्मान विद्यार्थी दशेपासून काम करणार्‍या कार्यकर्त्याचा आहे. याचबरोबर राज्याचा विकासाचा समतोल साधण्याची गरज असून दावोसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींच्या एमओयूंचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात होता. एमओयू होत असताना आम्ही गेली अनेक वर्ष पाहतोय की कंपन्या येतात, फोटोसेशन होतात, एमओयू होतात, सरकार कोणाचेही असो प्रत्यक्षात किती उद्योग येतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या उद्योगातून किती रोजगार निर्मिती झाली हे आपण कळू शकले नाही. हे उद्योग येत असताना ठराविक एमआयडीसीमध्येच येतात, ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये यावेत यासाठी आपण का प्रयत्न करत नाही ? असा सवाल सत्यजीत यांनी विचारला.

नावे शोभेसाठी टाकू नका

 आर्थिक सल्लागार परिषदेवर 18 जण असून त्यात 3 सनदी अधिकारी तर उरलेले हे उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आहेत. 13 फेब्रुवारीला या आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक झाली. याला 2 प्रतिनिधी हजर नव्हते. हे प्रतिनिधी होते करण अदानी आणि अनंत अंबानी. त्यांची नावे शोभेसाठी इथे टाकण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी अनेक कर्तृत्ववान उद्योजक आहेत जे उत्तम योगदान देऊ शकतात त्यांना या परिषदेवर घेऊ शकता’ अशी सूचना सत्यजीत तांबे यांनी केली.